पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे (loudspeaker) पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता सहा दिवस डाॅल्बी दणदणाटाने कान गच्च होऊन जाणार आहेत.


केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 अन्वये सण उत्सव कालावधीसाठी 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारी 2023 च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  2023 च्या सण उत्सवांसाठी 13 दिवस निश्चित करुन 2 दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवासाठी 5 दिवस निश्चित करण्यात आले होते.


विविध लोकप्रतीनिधी आणि गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळवले आहे. त्यानुसार राखीव 2 दिवसांपैकी 1 दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जारी केले आहेत.


गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार 23 सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार 24 सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार 25 सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार  27 सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार 28 सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी)  असे पाच दिवस लाऊड स्पिकरचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार 25 सप्टेंबर 2023 (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून लाऊडस्पीकरचा रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात सांगण्यात आलं आहे.


पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विसर्जन मिरवणूक 22 ते 24 तास चालतात. या दहाही दिवस पुण्यातील गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. त्यात आता सहा दिवस परवानी मिळाल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. 


कार्यकर्त्यांच्या मागणीला यश 


दिवस वाढवून देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर संपूर्ण विचार करुन एक दिवस वाढवून देण्यात आला आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar : 'मी अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो की...', अजितदादांच्या जबऱ्या चाहत्याने साकारला थेट शपथविधीचा देखावा