Pune Crime : पंजाबमधून पुण्यात कुरिअरनं दोन तलवारी मागवल्याची घटना घडली आहे. स्वारगेट पोलिसांनी या दोन्ही तलवारी जप्त केल्या आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट यार्ड परिसरातील एका कुरिअरद्वारे पुण्यात तलवारी आल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पुणे पोलीस कुरिअरची चौकशी करत आहेत. दरम्यान, अशाच प्रकारच्या तलवारी काही दिवसांपूर्वी औरंगाबादला मिळून आल्या होत्या. त्याचे काही कनेक्शन आहे का याचा तपास देखील करत आहेत.


दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस मार्केट यार्ड येथील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे तपासणी केली असता कुरिअर पार्सलमध्ये त्यांना दोन धारदार तलवारी सापडल्या. स्वारगेट पोलिसांनी तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत 'आर्म अ‍ॅक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 


मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये देखील अशीच घटना गडली होती. कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात एका दिवशी डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडून 37 तलवारी आणि एक कुकरी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या होत्या. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरिअर कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.


दरम्यान, औरंगाबाद प्रकरणात सात जणांच्या नावावर 37 शस्त्रांची ऑर्डर देण्यात आली होती. सात जणांपैकी पाच औरंगाबादचे तर दोन जालन्याचे होते. जालंधर आणि अमृतसरमध्ये ही ऑर्डर दिली होती. अमृतसर, दिल्ली, राजस्थाननंतर शस्त्र भिवंडीत पोहोचली होती. तिथून डीटीडीसी कुरिअर सर्व्हिसद्वारे शस्त्र औरंगाबादला पोहोचली होती.  2018, 2021 मध्येही अशाच प्रकारचा शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 37 तलवारी मागवल्याची घटना घडली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: