पुणे : मध्य आशिया आणि (Pune Crime News) आखाती देशांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून पुण्यातील महिलांची विदेशात विक्री करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. पुण्यातून विदेशात नेल्यानंतर तीन महिलांसह चार जणींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. ही घटना इतकी भयानक आहे की या महिलांनी त्या ठिकाणी होणारे भीषण वास्तव सांगितले आहे. पुण्यातून मोठा पगार देतो असे सांगत त्या ठिकाणी हे सगळे दलाल नेतात. मात्र, तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येत असल्याचं पिडित महिलेने सांगितलं आहे.
यातील काही महिलांनी विदेशातील छळाला कंटाळून पुण्यात परतण्यासाठी पुण्यातील दलालांना संपर्क साधला. त्यावेळी आरोपींनी चार लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर पाच लाख रुपयांत त्यांची पुण्यातून आखादी देशात विक्री करण्यात आल्याचं पीडित महिलांच्या लक्षात आलं. याशिवाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणात तातडीने लक्ष घालत सौदीच्या दूतावासाशी चर्चा केली. त्यानंतर सर्व महिलांची सुटका करण्यात आली.
महिलांना भारतात परत कसं आणलं?
या महिलांना भारतात परत कसं आणलं, याची माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्विटमधून दिली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, परदेशात नोकरीचे आमिष दाखवून दलालांच्या माध्यमातून फसवून नेलेल्या महिलांची राज्य महिला आयोगाने विशेष मोहिम राबवून या महिलांची सुटका केली. आपल्या देशात महिलांचा सन्मान केला जातो, मात्र काही दलाल महिलांची तस्करी करून, त्यांना फसवून परदेशात पाठवतात, पुणे, मुंबई, नागपूर सारख्या महानगरांमधून अनेक दलालांमार्फत महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या कडून भरपूर पैसे उकळून दुबई, ओमान, सौदी अरेबिया सारख्या देशांत पाठवले जाते.
या महिला परदेशात गेल्यावर त्यांच्या कडील पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली गेली. त्यांना कबूल केलेला पगार दिला नाही, त्यांना वेळेवर पुरेसं जेवण देखील दिले जात नव्हते. या महिलांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगासोबत फोन, मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. याची तात्काळ आणि गंभीरपणे दखल घेऊन महिला आयोगाने परराष्ट्र मंत्रालय आणि Ambassy यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार केला. आपल्या देशातील महिलांना घेऊन येण्यासाठी हवे ते सर्व प्रयत्न केले आणि या देशाच्या लेकींची परदेशातून सुटका करून त्यांना सुखरूप आणले. आपल्या राज्यातील महिलांची फसवणूक दलालांकडून होऊ नये, त्यांची तस्करी होऊ नये या दृष्टीने राज्य महिला आयोग विशेष लक्ष देऊन काम करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: