Pune Income Tax Raid : पुण्यात बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर; अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु
Pune Crime News: पुणे शहरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात येत आहे. आज सकाळपासून कारवाई सुरु झाली आहे.
Pune Income tax raid : पुणे शहरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात येत आहे. आज सकाळपासून कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांना रडारवर आहेत. पुण्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या कारवाईने पुण्यातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील बाणेर परिसरातील सिंध सोसायटी ही सर्वात पॉश सोसायटी म्हणून ओळखली जाते. याच सोसायटीत राहणारे तीन बांधकाम व्यायसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. हे तिन्ही व्यावसायिक एकमेकांचे व्यावसायिक भागीदार आहेत. आज सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहे आणि त्या प्रत्येक बांधकाम व्यावसायिकांच्या कागदपत्राची तपासणी सुरु केली आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिकमध्ये केली होती छापेमारी
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून अनेक बड्या नेत्यांसह बिल्डर्स, व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली होती. नाशिकचे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर होते. नाशिकमध्ये 15 हुन अधिक बांधकाम व्यवसायिकांवर गुरुवारी सकाळी छापे टाकण्यात आले होते. आयकर विभागाकडून महात्मा गांधी रोड, कुलकर्णी गार्डन यांसह शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या 15 अधिक बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांची घरे, कार्यालये यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुण्यातील व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर छापेमारीला सुरुवात झाली आहे. आता त्यांच्याकडे नेमकं काय धबाड आढळतं, याची माहिती काही वेळात समोर येईल. मात्र सगळे व्यावसायिक एकमेकांचे भागीदार असल्याचं सध्या आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ
आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते. त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान मे महिन्यात हे छापे पडल्याने आयकर विभागाकडून अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. अघोषित संपत्ती? की इतर काही कारणे आहेत. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं असून या छापेमारीत आता काय समोर येतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.