(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : पुणे हादरलं! भाजी कापण्याच्या चाकूने प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime News : पुण्यात मागील (pune crime news) काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यात प्रेमप्रकरणावरुन खूनाच्या घटनादेखील वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोलीत प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. वाघोली परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे दोघेही मागील काही महिन्यांपासून राहत होते. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात प्रियकराचा मृतदेह सापडला आहे. यशवंत महेश मुंडे ( वय 20) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर वार केल्याचे दिसून आले. प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. संबंधित प्रेयसीही यामध्ये जखमी झाली आहे. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत रहात होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते. त्या दोघांच्या भांडणात प्रेयसीही जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. वाद झाल्याने खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेली नाही.
पुण्यात खुनांच्या प्रकरणात वाढ
पुण्यात गुन्हेगारी वाढत असल्याचं अनेक घटनांमधून समोर येत आहे. त्यातच कालच पुण्यातील भोसरी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राची परवानगी न घेता खिशातून मोबाईल काढून घेतल्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. नारायण वाघमारे असे हत्या केलेल्याचं नाव असून अमर उर्फ अक्क्या गौतम कसबे (वय 24 वर्षे, रा. यशवंत नगर, सेक्टर 7, एमआयडीसी, भोसरी, पुणे) असं आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली होती. वाघमारे याने कसबे यांच्या खिशातून मोबाईल फोन त्यांच्या परवानगीशिवाय काढून घेतला, याचा राग येऊन आरोपी कसबे याने वाघमारेचं डोके दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे.