(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : 79 वर्षीय 'शौकिन' नागरिकाला 'डेटिंग'ची हौस पडली 17 लाखात; महिलेनं घातला ऑनलाईन गंडा
पुण्यातील एका शौकिन ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगची हौस चांगलीच महागात पडली आहे. महिलेने नागरिकाची तब्बल 17 लाखांची फसवणूक केली आहे.
Pune Crime : पुण्यातील एका शौकिन ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगची हौस चांगलीच महागात पडली आहे. डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का? असं या नागरिकाला विचारण्यात आलं होतं. त्यावेळी नागरिकाने महिलेकडे फोटोची मागणी केली होती. त्यानंतर महिलेने महिलेने नागरिकाला तब्बल 17 लाखांचा गंडा घातला. पुण्यातील पॉप्युलरनगर मध्ये राहणाऱ्या एका नागरिकासोबत या प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या महिलेविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का? असं या नागरिकाला विचारण्यात आलं होतं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराला सुरुवात झाली. एका दिवशी ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगसाठी (Dating) मुलगी हवी आहे का? असा फोन आला होता. यावर त्यांनी होकार दिला त्यानंतर त्या महिलेला फोटो पाठवण्यासाठी सांगितलं होतं. या फोटोसाठी वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकाकडून महिलेने पैसे मागितले होते. त्या महिलेने त्यांना काही कारणावरुन धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 17 लाख 10 हजार रुपये पाठवण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली. सदर महिला वेगवेगळ्या कारणावरुन सहा महिने पैसे मागत असल्याचंही ज्येष्ठ नागरिकाने सांगितलं आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक कारणांसाठी किंवा त्यांना खोटी महिती देऊन त्यांच्या कडून पैसे उकळले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच साडीचं आमिष दाखवून दोन महिलांना गंडा घातल्याची घटना समोर आली होती. आमच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे ते साडी आणि पैसे वाटणार आहे, असं सांगत दोन वृद्ध महिलांची फसणवूक केल्याचा प्रकार घडला होता. पुण्यात एकाच परिसरात नाही तर अनेक परिसरातून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. पाषाण, वडगाव बुद्रुक या परिसरातील महिलांची सव्वा दोन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेचा पुणे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्यांसाठी ज्येष्ठ नागरिक टार्गेटवर
या भुरट्या चोरांनीच नाही तर सायबर चोरांनी देखील वृद्धांना टार्गेट केल्याचं काही घटनांमधून सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगवेगळे फोन, डाऊनलोड केलेल्या अॅप अशा अनेक कारणावरुन ज्येष्ठांची फसवणूक सर्रास केली जाते. या सायबर गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी मोबाईल वापरताना किंवा कोणताही ऑनलाईन व्यावहार करताना घरातील लोकांचा सल्ला घ्याव्या, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.