पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगची दहशत असतानाच तसेच रस्त्यावर चिरडून मारण्याच्या घटना होत असतानाच आता थेट 'शिकलेल्या' डॉक्टरनेच कोयता हातात घेत तरुणावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या दोन गुंड साथीदारांनी मिळून प्रितेश बाफना यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार संबंधित फिर्यादी तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यामध्ये आता डॉक्टरांनी सुद्धा कोयता हातात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वाघोलीमधील लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत पसरली आहे. कोयत्याने दिवसाढवळ्या हल्ले होत असल्याने कोयता गँगचा सुफडासाफ करावा, अशी मागणी पुणेकराकंडून होत असतानाच आता थेट शिकलेला डॉक्टर कोयता घेऊन रस्त्यावर उतरल्याने पुणे कोणत्या दिशेनं चाललं आहे याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून


दरम्यान, पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खालुंब्रे गावाच्या हद्दीत 1 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सनी रामदास तुळवे (वय 26), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय 34, दोघे रा. खालुंब्रे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तुळवे (वय 30, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रणय प्रदीप ओव्हाळ (वय 21, रा. कान्हे फाटा, वडगाव, ता. मावळ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणय आणि त्यांचा मामा गणेश हे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. ते तळेगाव-चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊससमोर आले असता दोन संशयित हे दुचाकीवरून आले. त्यांनी गणेशवर कोयत्याने वार केले. यामध्ये गणेशचा मृत्यू झाला. मामाला सोडविण्यासाठी फिर्यादी प्रणय गेला असता संशयितांनी त्याच्यावरही कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.


इतर महत्वाच्या बातम्या