पुणे: मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. 'साहेब मला माफ करा', असे मी त्या मेसेजमध्ये लिहले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा फोन आला होता. पण आता खूप उशीर झाला आहे मी त्यांना ठीक आहे बोललो, पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलोच, असे वसंत मोरे (Vasant More) यांनी म्हटले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलत होते.
वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील. याबाबत बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या 18-19व्या वर्षी मी इकडेच शिवसेनेची शाखा सुरु केली. 31 वर्षांचा होईपर्यंत मी शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 9 जुलैला मी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
कुठल्याही प्रलोभानापोटी मी शिवसेनेत जात नाही. उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल. विधानसभा का महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवले जाईल. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळे लक्षात घेता वंचित पक्ष सोडला. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी माझं काम केलं नाही. त्यामुळे माझे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशी या गोष्टी संदर्भात चर्चा झाली होती, असेही वसंत मोरे यांनी म्हटले.
वसंत मोरे फक्त निवडणूक लढायला वंचितमध्ये गेले होते: संजय राऊत
वसंत मोरे फक्त लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीत गेले होते, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. अनेक लोक निवडणूक लढण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातात. गोपीचंद पडळकरही निवडणूक लढायला वंचितमध्ये गेले होते, मग त्यांचं काय? लोकशाहीत आणि राजकारणात लोक पक्षांतर करतात, भूमिका बदलतात. आमचे 40 आमदार गेले, पण आम्ही त्यांचा पराभव करु. या देशात लोकशाहीचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना लोकशाही मान्य असली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार