पुणे: लोकसभा निवडणुकीत पुण्यातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वसंत मोरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतल्याने यावर शिक्कामोर्तब झाले होते. येत्या 9 जुलैला वसंत मोरे (Vasant More) हे ठाकरे गटात रितसर  प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. वसंत मोरे यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पुणे लोकसभेसाठी संधी दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीतील अवघ्या काही दिवसांच्या मुक्कामानंतर ठाकरे गटात बस्तान हलवण्याचा निर्णय घेतला आहे.


वसंत मोरे यांची ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या फारशी पचनी पडलेली नाही. त्यामुळे वंचितच्या पुण्यातील कार्यकर्त्यांकडून कात्रज येथील वसंत मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरच आंदोलन करण्यात येणार आहे. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाशी केलेली फसवणूक व आदरणीय नेते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा केलेला विश्वासघात या घटनांच्या निषेधार्थ वसंत मोरे यांचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी/युवा आघाडी/महिला आघाडी/माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असा मेसेज वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. 


वसंत मोरे हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात


विधानसभा निवडणुकीसाठी मला दोन पर्याय आहेत.  आगामी निवडणूक  खडकवासला आणि हडपसर, दोन्हींकडून लढू शकतो.  पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली.  माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू.  शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत. बाहेर त्यांची ताकद आहे, असे वसंत मोरे यांनी म्हटले होते.


प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांना भेटणार


प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, प्रशासनाकडून गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, तसेच गावातील शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, त्यावर स्टे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ते भेट घेणार असल्याचे समजते. 


आणखी वाचा


सुजात आंबेडकरांची 'ती' दोन वाक्य ऐकून मी भरुन पावलो; वसंत मोरेंनी सांगितला राजगृहावर घडलेला किस्सा


मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार