पुणे : नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि राष्ट्रपती होतील, त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये काहीही इंटरेस्ट नाही, फक्त तशी इमेज हवी आहे असं वक्तव्य जेष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केलं. आधी मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करायचे, पण निकाल लागल्यानंतर सगळं बदललं असंही केतकर म्हणाले.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या संसदेतील निवडक भाषणांचे संकलन असलेले "संसदेत गर्जतो शिवनेरीचा छावा" या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असिम सरोदे यांच्या उपस्थित करण्यात आलं. यावेळी कुमार केतकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.


नरेंद्र मोदी 2027 साली राष्ट्रपती होतील


कुमार केतकर म्हणाले की, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना आता कशी वागणूक मिळतेय ते आपण पाहतोय. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि 2027 साली राष्ट्रपती होतील. मोदी 2032 पर्यंत त्या पदावर राहतील. त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये जास्त इंटरेस्ट नाही पण त्यांना त्या प्रकारची इमेज हवी आहे.   


काय म्हणाले कुमार केतकर? 


मोदींचा पराभव होणार होता, पण त्यांना वाचवण्यात आलं


मोदी याचा बनारसमधला पराभव होता होता वाचला. पण मला नंतर कळलं की त्यांना निवडून आणण्यात आलं, त्यांचा पराभव परवडणार नव्हता. भाजपला लोकसभेमध्ये फक्त 180 जागा मिळणं शक्य होतं, मात्र त्यांना हे कळल्यानंतर त्यांनी जागा मॅनेज केल्या, पक्ष फोडले. त्यांनी गेम प्लॅन केला होता.


भाजपने निवडणूक आयोगाकडून लगेच मतदान झालेली माहिती मागवली. कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झाले आणि निकाल कसा असेल हे सगळं मागवले होते. भाजपने काही संस्था ताब्यात घेण्याचं काम केलं.


पुलवामामध्ये नेमकं काय झालं याची माहिती दिली नाही 


पुलवामामध्ये काय झालं याबद्दल सरकारने काहीच जाहीर केलं नाही, काहीच चेकिंग झाल नाही. मोदींनी याबाबत कुठलाच खुलासा केलेला नाही. तिकडे एवढे आरडीएक्स कुठून आलं? बालाकोट हल्ल्यानंतर अनभुव कळला नाही. मोदी-शाह यांनीपण सागितले नाही. कशाचीच श्वेतपत्रिका काढली नाही. 


निवडणूक निकालाअगोदर केदारनाथला तपस्या करत होते, गेल्या वेळी अशी तपस्या केली आणि जागा वाढल्या. पण यावेळी तसे काही घडलं नाही.


निवडणूक आयोग प्रमुखांनी राजीनामा दिला. अशी लोकशाही कधी देशात नव्हती. याआधी वाजपेयी, इंदिरा गांधी आणि प्रत्येक खासदार प्रश्नांची उत्तरं देत होता.  पण आता असं होताना दिसत नाही.


मोदींनी चहा विकलेलं स्टेशनच अस्तित्वात नाही


आपल्यात पेट्रोल दर वाढले तरी चालतील पण पंतप्रधान मोदी हवेत असं म्हणणारे लोक आहेत. माझीही राज्यसभा खासदार निवड अनपेक्षित होती, माझी निवड राज्यसभेवर झाली. माझी इच्छा नव्हती पण मला माहिती नव्हतं ते झालं.


नरेंद्र मोदी कायम माझ्या शत्रूस्थानी राहिलेले आहेत. मी गुजरातमध्ये पत्रकारिता केली आहे. मला त्यांचे कोणी मित्र, शिक्षक किंवा इतर कोणीही भेटल नाही. चहा विकणारे स्टेशन पण नव्हतं. मोदींनी त्यांच्या अनेक कथा या विज्ञानाच्या पुढे नेल्या. 


राज्यसभेत मोदी खूप कमी यायचे. ते आले की भाजप सदस्य त्यांचे बाके वाजवत स्वागत करायचे. जय श्रीराम घोषणेने त्यांचं स्वागत व्हायचं. पण अशा घोषणा दिलेलं चालत नाही.


राहुल गांधींच्या भाषणानंतर मोदी पाणी प्यायले


मोदींना कधीही खोकला, शिंक असं काहीही आलेलं आपण पाहिलं नाही. ते बायोरोबो आहेत ते. मात्र राहुल गांधी यांच्या भाषणानंतर त्यांना तहान लागली. तब्बल 12 वेळा ते पाणी प्यायले. आता त्यांना लक्षात आलं असेल की आपण बायोरोबो नाही.


निकालानंतर अनेक गोष्टी बदलल्या


मोदी हे गांधी कुटुंबावर टीका करत होते. पण निकाल आल्यावर सगळं बदलले. जागा कमी आल्याने मोदींनी राजीनामा द्यायला हवा होता, त्यांना हव्या तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत. देशातील मध्यमवर्ग मोदींसोबत आहेत. मध्यम वर्गाला अनेक गोष्टी पटलेल्या आहेत. 


मोदींनी भाजपमधील अनेक वरिष्ठांना मार्गदर्शक यादीतच टाकून दिलं आहे. मोदींच्या काळात चर्चा न होता अनेक कायदे संसदेत पास झाले, मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादीही म्हटलं. 


राज ठाकरे यांचा नामोनिशाण उरला नाही, अजित पवार संपले असं म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पण वेगवेगळे बोललं जात होते.