Pune bypoll election : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेनी(amol kolhe) चिंचवड विधानसभेतील मविआचे बंडखोर राहुल कलाटेंचा (Rahul kalate) अप्रत्यक्षरीत्या (Pune Bypoll Election) प्रचार केला आहे. नाना काटे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असताना कोल्हेनी शिट्टी वाजवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. एबीपी माझाने कोल्हे यांची याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही. अमोल कोल्हे आणि राहुल कलाटे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तेच कलाटे बंडखोरी करून सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहे. या निवडणुकीसाठी त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळालं अन तीच शिट्टी कोल्हेनी फुंकल्यानं आता चर्चा तर होणारच. दुसरीकडं कलाटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत कोल्हेनी फुंकलेली शिट्टी व्हिडीओच्या स्वरूपात पोहचवली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार आपल्या पक्षाच्या विचारधारेचा असला तरी त्याविरोधात उभा असणारा एखादा उमेदवार जनसामान्यांसाठी शिट्टी फुंकत असेल, तर सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करायला हवं. कारण पक्ष तुमचे प्रश्न सोडवायला येत नाही, तुमचा लोकप्रतिनिधी उत्तरं देणारा असायला पाहिजे. मतदारांनी हे लक्षात ठेऊन मतदान करायला हवं, असं आवाहन करत कोल्हेनी शिट्टी ही फुंकून दाखवली.
खरं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांसह अमोल कोल्हे याचं नाव ही राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत होतं. या सर्वांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली पण अमोल कोल्हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाना काटेंच्या प्रचारासाठी फिरकलेच नाहीत उलट कोल्हे यांनी बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं चिन्ह असलेली शिट्टी नागपुरात फुंकली, त्याच शिट्टीचा आवाज कलाटे यांनी चिंचवडच्या मतदारांपर्यंत पोहचवला आहे. अशा पध्दतीने कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे कलाटे यांचा प्रचार केला.
नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात शिवशाही महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. तेंव्हा 'लोकशाहीचा स्तंभ भारतीय संविधान' या विषयावर कोल्हे यांनी संवाद साधला. यात संविधान वाचवायचे असेल तर निवडणुकीत मतदान करताना योग्य तो उमेदवार निवडून द्या, मग त्या एकवेळ आपल्या पक्षाच्या विचारधारेचा नसला तरी चालेल. पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा असावा, तरचं संविधान टिकेल असं कोल्हेंनी नमूद केलं. फार किचकट वाटत असेल तर एक उदाहरण देतो, असं म्हणत कोल्हे यांनी शिट्टी मागवून घेतली आणि मंचावर शिट्टी वाजवली. ही शिट्टी सध्या चिंचवड विधानसभेत तुफान व्हायरल झाली असून राहुल कलाटे मतदारांना अमोल कोल्हे माझ्या पाठीशी असल्याचं सूचित करत आहे. खासदार कोल्हे हे सध्या निपाणीमध्ये असल्याचं त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून सांगण्यात येतंय. पण त्यांचे तिन्ही फोन स्विच ऑफ येत आहे. त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. शिवाय पक्षाकडून याबाबत काय खुलासा येतो? हे पाहणं ही महत्वाचं आहे.