Pune Bypoll Election :  भारतीय जनता पक्षाकडून  (Pune Bypoll Election)  कॉंग्रेसचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर  यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर आंदोलन करुन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि धंगेकरांच्या सभेत धार्मिक धृवीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आचारसंहितेचा भंग करत आज रविंद्र धंगेकर उपोषणाला बसले होते असा आरोप भाजपने केला आहे.


कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून पैशांचा वापर सुरु आहे, असा काल कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आज सकाळी 10 वाजता पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या उपोषणाला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता तरीही भाजपचे नेते रात्री 9 वाजेपर्यंत भाजप नेते प्रचार करत होते. ही साफ लोकशाहीची हत्या आहे, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर केला. मागील काही दिवस पुण्यात पैशांचा पाऊस पडत आहे. हे सगळं पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने बघत असतात. ही दडपशाही आहे, असंही ते म्हणाले. काही वेळाने पोलिसांनी धंगेकरांना कारवाईचं आश्वासनं दिलं त्यानंतर धंगेकरांनी उपोषण मागे घेतलं. मात्र धंगेकरांचा हाच उपोषणाचा मुद्दा समोर ठेवून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यांनी थेट धंगेकरांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.


ही तर लोकशाहीची हत्या; धंगेकर


भाजप नेते पोलिसांच्या उपस्थितीत प्रचार करत आहेत. त्यामुळे ही लोकशाहीची हत्या आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग बघत आहे. तरीदेखील त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही आहे. पोलीस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील करत आहे. गुन्हेगार आणि पोलीसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकरांना पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं उपोषण करत आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.