पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकांचा धडाका सकाळपासून पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये सुरु आहे. रायगडावरील पक्ष चिन्हाच्या कार्यक्रमापूर्वी बैठकीत आत्या-भाचा म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवारांनी  (Rohit Pawar) हजेरी लावली. या बैठकीला भल्या सकाळी दोघे हजर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र कालवा समितीची बैठक असल्याचं आणि आमच्या परिसरातील पाणी प्रश्नावर तोडगा काढायला आलो असल्याचं दोघांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. मागील काही दिवसांपासून  सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात कलगीतुरा रंगताना दिसत आहे. त्यानंतर आज तिघांनी एकाच बैठकीत हजेरी लावली आहे. 


खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी बैठकीला आले. दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या भागातील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. या भागातील पाणी प्रश्नावर गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करण्यासाठी बैठकीला हजेरी लावली. राज्यातला पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढावा आणि शिवाय अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवावा या मागणीसाठी बैठकीला हजेरी लावली असल्याचं त्या म्हणाल्या.


त्यासोबतच सकाळीत रोहित पवारदेखील या बैठकीत बसून दिसले. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. या बैठकीनंतर बोलताना त्यांनीदेखील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले की, माझ्या मतदार संघात कुकडीचे पाणी येते. ते 1 मार्च पासून सोडावे, अशी विनंती अजित अजित पवारांना केली. ती त्यांनी मान्य केली आहे. माझ्या मतदार संघातील दुसरे आमदार राम शिंदे यांनी कुकडीतून पाणी सोडण्यास विरोध केला आहे. उजनीतील पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा पट पाणी पट्टी दर केला आहे. तो कमी करण्यास अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा  आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर चिन्हाचं लॉन्चिग होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे महत्वाचे सगळे नेते हजर राहणार आहे. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी आवर्जून कालवा समितीच्या बैठकीला हजेरी लावली होती. 


इतर महत्वाची बातमी-


Kiran Samant: किरण सामंतांचा नारायण राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकसभा उमेदवारी मिळाल्याच्या चर्चांना उधाण