पुणे : इंडिया आघाडीने त्यांचा पंतप्रधान (INDIA Alliance) पदाचा उमेदवार जाहीर करून दाखवावा, असं खुलं आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिलं आहे. 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' च्या पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
ते म्हणाले, 'इंडिया आघाडीच्या तीन बैठका मी बघितल्या आहेत. मी राजकारणातला लहान माणूस आहे. पहिल्या बैठकीतील नेते दुसऱ्या बैठकीला नव्हते दुसऱ्या बैठकतील तिसऱ्या बैठकीला नव्हते. या आघाडीत जे पंतप्रधान पदाचे दावेदार होते. त्यांनीच वेगळी भूमिक घेतली आहे. त्यामुळे येत्या बैठकीत इंडिया आघाडीने पंतप्रधान मोंदीच्या विरोधात लढणारा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस दाखवावं, असं खुलं आव्हान त्यांनी इंडिया आघाडीला दिलं आहे.
त्यासोबतच मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्या वादावरदेखील त्यांनी भाष्य केलं. 'मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकार ला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये, अस आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील आणि बारसकर महाराज यांना केलं आहे.
'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'तून काय मिळणार
संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
तीन दिवस प्रदर्शन पाहता येणार
सामंत म्हणाले, 24 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत 3 दिवस सुरू राहणार असून त्यासाठी 20 दालने तयार करण्यात आली आहेत. तसेच खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येतील. या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे, शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असेही ते म्हणाले. प्रदर्शनातील चार भव्य दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असं सामंत यांनी सांगितले.
इतर महत्वाची बातमी-
Pune Traffic Diversion : बंडगार्डन आणि कोरेगाव पार्कमधील वाहतुकीत बदल; कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?