बारामती : नीरा देवघर धरणाचं पाणी वळवण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत बारामतीकरांनी आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. चक्री उपोषण करणार असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं. राज्य सरकारने समन्यायी पद्धतीने पाण्याचं वाटप करावं, अशी आग्रही मागणी करत 20 जूनपासून आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.


शासनाकडून पाण्याबद्दल दुजाभाव केला जात असल्याची भावना व्यक्त करताना आता राजकीय जोडे बाजूला ठेवून लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. नीरा देवघर धरणाचं डाव्या कालव्याला जाणारं पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील शेतीवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभुमीवर आज बारामतीतील नीरा कॅनॉल खरेदी विक्री संघात सर्वपक्षीय बैठक पार पडली.


काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह भाजप-सेनेच्या पदाधिकार्‍यांनीही या बैठकीत हजेरी लावली. या बैठकीत उपस्थित शेतकर्‍यांनी सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. 20 जून रोजी प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचं शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीशराव काकडे यांनी सांगितलं.


शासनाने नीरा देवघर धरणाचं पाण्याबाबत राजकीय आकसातून निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये संताप असून या निर्णयाच्या विरोधात बारामतीत चक्री उपोषण केलं जाणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी सांगितलं.


आणखी वाचा