पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेच्या नऊ साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 15 फेब्रुवारीला पुणे बेंगलोर महामार्गावर विना परवाना रॅली काढणे, आरडाओरडा करणे, सामान्यांची वाहनं रोखून दहशत माजवणे, याप्रकरणी गजासह 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील शिरगाव पोलीस चौकीअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये ही 36 साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. गजापर्यंत मात्र पोलीस पोहचू शकले नव्हते. तो अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न करत होता. शिरगाव पोलीस चौकीच्या गुन्ह्यात त्याने वडगाव मावळ न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला होता. तेंव्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर त्याने तुरी दिली होती.


मुंबई, रायगड आणि पुणे अशा तीन जिल्ह्यातील पोलिसांच्या देखत अक्षरशः गाजावाजा करत गजानन घरी दाखल झाला होता. नंतर मात्र तो फरार झाला आणि त्याच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांची फौज त्याच्या मागावर होती. पण या दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या हातावर तुरी देत तो थेट वडगाव मावळ न्यायालयात हजर झाला आणि जामीन मिळवून मोकळाही झाला. तरी पोलिसांना याची काहीच कल्पना नव्हती ही मोठी शोकांतिका आहे. 15 फेब्रुवारीला त्याने माजवलेल्या उतमाताप्रकरणी पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते.


गजा मारणेची पोलिसांच्या हातावर तुरी


कोथरूड पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांना 17 फेब्रुवारीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, तेव्हा इतर पोलीस स्टेशनने अटकेसाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केले होते. मात्र, आधी नोटीस द्या आणि चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर राहण्याच्या सूचना द्या असं म्हणत न्यायालयाने पोलिसांचे अर्ज फेटाळले. तेव्हापासून तो फरार होता, त्याच्या मागावर पिंपरी चिंचवड पोलिसांची चार आणि पुणे पोलिसांची अन्य पथकं रवाना होती. गेल्या आठवड्याभरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी गज्याच्या 36 साथीदारांना बेड्या ठोकल्या, तर 14 अलिशान वाहनंही जप्त केली. यात शिवसेनेचा लोगो असलेल्या एका वाहनाचा समावेश आहे. पोलीस गज्याच्या साथीदारांपर्यंत पोहचत होती, पण गज्या मात्र राजरोसपणे मोकाट होता. आजतर त्याने पोलिसांना कसलीच खबर न लागू देता थेट न्यायालय गाठलं आणि अटक टाळली.


गजा मारणेला मागावर असलेल्या पोलिसांची खबर मिळत होती?


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून विनापरवाना तीनशे वाहनांची रॅली काढणे, उर्से टोल नाक्यालगत फटाके फोडणे तसेच आरडाओरडा करत या सर्वांचं ड्रोन द्वारे चित्रीकरण करण्यात आलं होतं. शिरगाव पोलिसांनी म्हणूनच गुन्हा दाखल केला. याचप्रकरणी गज्याचा शोध सुरू होता. तेच पोलीस आज इतर गुन्ह्यातील आरोपींना घेऊन दुपारी तीन वाजता वडगाव न्यायालयात पोहचली होती. त्यांचीही न्यायालयीन प्रक्रिया संपवून ते पोलीस चौकीकडे परतले आणि लगेचच गजा मारणे न्यायालयात हजर झाला. त्यामुळे पोलीस गज्याच्या मागावर होते, तसंच गजा ही पोलिसांची खबर ठेवत होता का? पोलिसांची ही खबर त्याला नेमकी कोण देत होतं? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :