पुणे : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर हातात शस्त्र घेत दहशत पसरवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून याची दखलही घेतली जात असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा बंदुकीत गोळ्या भरताना दिसत आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. तर स्थानिक नागरिकांनी मात्र दहशत पसरविण्यासाठी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असल्याचे सांगितले.


अल्पवयीन मुलाने बंदुकीत गोळ्या भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान हा सर्व प्रकार बिबवेवाडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. व्हिडीओमध्ये व्हायरल झालेल्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्याचे आदेशही  पोलिसांनी दिले आहे.  त्यानंतर काही वेळातच या मुलाची ओळख पटली आणि त्याचा पत्ता ही पोलिसांना सापडला.. पोलिसांनी तातडीने या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.  मुलाची  चौकशी केली असता  वेगळेच सत्य बाहेर आले.


या मुलाजवळ असलेली बंदूक खेळण्यातली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या बंदूकीची पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले होते.  पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला.