पुणे : म्हशींना पाणी पाजण्यावरुन झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. अजय अनुराग साठे (वय 40 वर्षे) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर बापू लक्ष्मण जोरी असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मूळशी तालुक्यातील माळीण गावात काल (1 मार्च) दुपारी किरकोळ कारणावरुन एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. अजय साठे आणि बापू जोरी यांच्यात म्हशीला पाणी पाजण्यावरुन वाद झाला. यानंतर बापू जोरीने छर्र्याच्या बंदुकीने अजय साठेची गोळी झाडून खून केला.


आरोपी आणि मृत व्यक्तीमध्ये यापूर्वी जमीन प्रकरणातून वाद होते. अजय साठे काल संध्याकाळी चारच्या सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी ओढ्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी पाणी पाजू नये यावरुन दोघांमध्ये वाद झाले. यावेळी संतापलेल्या अजय साठेने बापू जोरीच्या कानाखाली लगावली. याचा राग मनात ठेवून बापू जोरीने घरी जाऊन छर्र्याची बंदूक आणली आणि अजय साठेवर गोळी झाडली. या घटनेत अजय गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पौड पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.