Sharad Pawar : केंद्रानं राज्याचा जीएसटी लवकर द्यावा, इंधन कपातीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
Sharad Pawar : राज्यातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कपात करत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होती.
Sharad Pawar : केंद्र सरकारने बुधवारी सायंकाळी इंधनावरील कर कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीला थोडासा ब्रेक लागलाय. केंद्रानं कर कपात केल्यानंतर अनेक भाजपशासित राज्यातही करांमध्ये कपात करण्यात आली. राज्यातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कपात करत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धरली आहे. याला बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेली दोन वर्षे सर्वांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही. आता कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे यंदाची दिवाळी जनतेला साजरी करता येत आहे. पण कोरोना नियमांची तयारी असायला हवी आणि ती दिसते.आज देखील हा कार्यक्रम शिस्तीने, खबरदारीने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही घेतल्या, असं पवार म्हणाले. पेट्रोल डिझेल दरांमध्ये राज्याकडून दिलासा मिळणार का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘राज्य सरकारशी बोलावं लागेल. तसं सरकारने सुचवलं आहे की निश्चित दिलासा देऊ. पण केंद्राने राज्याचा जीएसटी कृपा करून लवकर द्यावा. म्हणजे जनतेच्या हिताचा निर्णय लवकर घेणं शक्य होईल.’
एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा, असं शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं.
कार्यक्रमाला अजित पवार का नव्हते?
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. यावरुनही शरद पवार यांनी स्पष्टीकऱण दिलं. अजित पवारांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं.