(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिंपरीत आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू
जावेद शेख यांच्याआधी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा ही कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. 4 जुलैची ही घटना ताजी असतानाच शेख यांचा ही मृत्यू झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला.
पिंपरी चिंचवड : शहरात आणखी एका विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. जावेद शेख असं त्यांचं नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. 15 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेंव्हापासून आकुर्डीतील स्टार या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, मग पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ते 49 वर्षाचे होते. बकरी ईदच्या आधल्या दिवशी ही दुःखद वार्ता हल्याने कुटुंबियांसह समाजात हळहळ व्यक्त केली जातीये.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शेख यांच्याकडून गरजूंना मदतकार्य सुरू होतं. त्यामुळे त्यांचा अनेकांशी थेट संपर्क येत होता. अशातच शेख यांना कोरोनाची लक्षणं आढळू लागली, त्यामुळं त्यांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले. 15 जुलैला अहवाल आला आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मग ते तातडीने आकुर्डीतील स्टार या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. अगदी पाच दिवसांपूर्वीच त्यांचं स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलणं ही झालं होतं. त्यावेळी त्यांच्या तब्येतील कमालीची सुधारणा होती. पण नंतर शेख यांना न्युमोनिया झाला आणि हळूहळू काही अवयव निकामी होऊ लागले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरी ही तब्येतील फारशी सुधारणा झाली नाही आणि आज अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. तर पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील जावेद शेख यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
जावेद शेख सलग तीनवेळा नगरसेवक झाले होते. 2007च्या महापालिका निवडणुकीत तर बिनविरोध निवडणूक येण्याचा त्यांना मान मिळाला होता. त्यानंतर 2012 आणि 2017च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले होते. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी तीन दिवसांचं जे नाट्य घडलं, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याच्या दिशेने पावलं उचलली होती.
जावेद शेख यांच्याआधी माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचा ही कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. 4 जुलैची ही घटना ताजी असतानाच शेख यांचा ही मृत्यू झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. महापालिका सभागृहात आवाज उठवणारे दोन सदस्य सोडून गेल्याने सर्व पक्षीय नगरसेवक चिंताग्रस्त आहेत. उद्या बकरी ईद आणि आज शेख यांचं अकाली निधन झाल्यानं कुटुंबियांसह समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :