पुणे : देशातील बहुचर्चित उद्योगपती गौतम अदानी आज बारामतीत होते. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं. जे अदानी एरवी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतात त्याच अदानींनी आज विरोधी पक्ष ज्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात त्या पवारांच्या घरी पाहुणचार घेतला.
जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी एरवी ओळखले जातात ते पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत असलेल्या गाढ्या मैत्रीसाठी. याचमुळे अदानी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेचे ही लक्ष्य असतात. मात्र याच अदानींची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्यासोबत देखील तेवढीच गहिरी दोस्ती आहे. आज बारामतीत पवार कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना अदानी सहकुटुंब हजर होते. अदानी जेव्हा बारामती एअरपोर्टवर पोहचले तेव्हा आमदार रोहित पवार त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. तिथून पुढे रोहित पवारांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं आणि अदानी जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा त्यांनी शरद पवारांचा हात हातात घेऊन नमस्कार केला. पण अदानींची हा काही पहिलाच बारामती दौरा नव्हता, सुप्रिया सुळेंनी याचा खुलासा केला.
गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत. अदानी दर वर्षी दिवाळीला बारामतीत येतात. आज तिथीनुसार दिवाळी नसली तरी सायन्स सेंटरचे उद्घाटन हा दिवाळीचा योग आहे आणि अशावेळेस गौतम अदानी उपस्थित आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. खरं तर कोणी कोणाशी मैत्री करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अदानींबाबत असं म्हणता येत नाही. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर अदानींच साम्राज्य देश - विदेशात ज्या वेगाने वाढलय त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं मोदींबरोबरच अदानींच नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मुंबई एअरपोर्टला अदानींचे नाव देण्यावरून आंदोलन केलं होतं तर राहुल गांधींसह कॉंग्रेसचे नेते अदानींवर मोदी सरकार मेहरबान असल्याचा नेहमीच आरोप करत असतात. पण त्याच शिवसेना आणि कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे गौतम अदानी हे तेवढेच मित्र आहेत. हा मैत्रीचा त्रिकोण आहे. यातील मोदी आणि अदानी हे दोन कोन अनेकांना माहित असतात पण तिसरा पवार नावाचा कोण बऱ्याचदा अदृश्य स्वरुपात असतो. पडद्यामागच्या हालचालींसाठी या त्रिकोणी मैत्रीचा उपयोग होतो. 2014 साली या मैत्रीतुनच गुजरातमधील अदानींच्या फार्महाऊसवर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली होती.
कार्यक्रम आटोपल्यावर गौतम आणि त्यांची पत्नी प्रिया अदानी यांनी शरद पवारांच निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत जाऊन पवारांचा पाहुणचार घेतला. यावेळी सर्व पवार कुटुंब हजर होतं. खरं तर राजकारणी आणि उद्योगपती यांचे संबंध असल्याचे अनेकदा दिसून येतं. शरद पवारांचे तर अनेक उद्योगपतींशी नेहमीच मैत्रीचे संबंध राहिलेत. पण गौतम अदानींची गोष्ट निराळीय. कारण अदानी आणि त्यांच्या सुपरसोनिक वेगाने झालेल्या प्रगतीचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जातो. पण त्याच अदानींशी मोदी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवारांची गहिरी मैत्री अनेकांना बुचकळ्यात टाकणारी वाटू शकते.
विरोधी पक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टिका अदानींच नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही .त्याच विरोधी पक्षांसोबत आदल्या दिवशी राष्ट्रपती निवडणुकीत मोदी विरोधाची आखणी करणारे शरद पवार रातोरात प्रवास करून बारामतीत पोहचतात आणि सहकुटुंब अदानींचे स्वागत करतात. पवारांचा हा सर्वस्पर्शीपणा त्यांच्या राजकारणाच वेगळेपण राहिलय. हे वेगळेपण पवारांच्या राजकारणाला अनेकदा गहिरं बनवतं आणि कित्येकदा टिकेचे धनीही बनवतं.
संबंधित बातम्या :