Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नाही. या प्रकरणात माध्यम देवस्थानाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं म्हणत संतापलेले देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरेंनी पत्रकार परिषदेतून उठून जातो, असा इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन आणि टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पालखी प्रस्थानाला आमंत्रण दिल्याचं म्हणत अध्यक्ष मोरेंनी प्रकरण सावरण्याचे आधी प्रयत्न केले. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाने ते चांगलेच संतापले.


पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे जगदगुरु संत तुकाराम महाराज देवस्थानला चांदीचे सिंहासन देणार आहेत. त्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, या पत्रकार परिषदेसाठी देहू संस्थानचे विश्वस्त ही उपस्थित होते. यावेळी उपस्थित काही प्रश्नांमुळं देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे संतापले आणि उठून जाऊ लागले होते. देहूतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना का बोलू दिल नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला उत्तर देताना नितीन महाराज मोरे यांनी अजित पवारांना प्रस्थानाचे आमंत्रण दिले आहे, येत्या 20 जूनला त्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करेल. असं स्पष्ट करत पंतप्रधानांच्या कार्यक्रमानंतर उपस्थित झालेल्या प्रकारणामुळं अध्यक्ष मोरे पत्रकारांवरच संतापले. 


 देहू संस्थानला माध्यमामार्फत बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिळा मंदिराची पायाभरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केली होती. त्याचा संपूर्ण खर्च राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी केला. तेंव्हा असे प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत. पंतप्रधान आले आणि अजित पवारांना बोलायची संधी मिळाली नाही. तेंव्हाच आम्ही एखाद्या पक्षाशी संबंधित आहोत, असं दाखवलं जातंय. 


आमचं संस्थान हे धार्मिक अन् संप्रदायिक आहे. आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध जोडू नका, असं नितीन महाराज मोरेंनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना का बोलू दिलं?, असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी विचरला असता ते संतापून म्हणाले अजित पवारांना का बोलू दिल नाही?, हे तुम्ही त्यांना जाऊन विचारलं तर योग्य राहील. 


फडणवीस भाषण करणार आम्ही ठरवलं नव्हतं, पीएमओ ऑफिसने ठरवलं होतं. हे मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांचे प्रश्न थांबतच नव्हते, त्यामुळं संस्थानचे अध्यक्ष संतापले. राष्ट्रवादीचे आमदार बनसोडेनी ज्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली, ते सोडून आम्हाला हे प्रश्न विचारले जातायेत. त्यामुळं माफी मागून मी रजा घेतो. असं म्हणत पत्रकार परिषद सोडून जातो, असा इशारा अध्यक्ष मोरेंनी दिला. नंतर आमदार बनसोडेनी समजूत काढल्यावर ते पत्रकार परिषदेत बसून राहिले.


या प्रकरणावर अजित पवार काय म्हणाले?


देहुमधील कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान दिल्लीत पोहचले.  देहुत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू हे वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमाला आले होते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.