Bharat Ganehshpure News:  वैदर्भीय भाषा घराघरात पोहचवणारे अभिनेते भारत गणेशपुरे आता हिन्दीत पदार्पण करत आहेत. सोनी हिंदीवर लवकरच नवा कॉमेडी शो सुरु होणार आहे. इंडियाज लाफ्टर चॅम्पियन असं या शोचं नाव आहे. याच शोमध्ये भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे आता ही जोडी दिसणार आहे. झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर सगळ्या महाराष्ट्राने प्रेम केलं मात्र आता प्रेक्षकांंची लाडकी ही जोडी चला हवा येऊ द्या कार्यक्रम सोडणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.


भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या जोडीवर महाराष्ट्राने  प्रेम केलं. हीच जोडी आता हिन्दीतील इंडियाज लाफ्टर चॅम्पियन हा कार्यक्रम गाजवायला सज्ज झाली आहे. मात्र चला हवा येऊ द्या हा शो सोडणार का?, असा प्रश्न मराठी प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे या जोडीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


कॉमेडी करणं फार सोपं काम नाही. त्यासाठी टायमींग जुळणं आणि बारीक लक्ष ठेवणं गरजेचं असतं. सतत गोष्टींचं निरिक्षण करावं लागतं. मराठी बोलायची त्यात कॉमेडीचं टायमिंग पकडण्याची सवय झाली होती. आता मात्र हिंदीत काम करायचं म्हटलं तर थोडीफार भाषेची समस्या जाणवते. मात्र मी विदर्भाचा असल्याने भाषेचा फार फरक जाणवत नाही आहे. कॉमेडीची कोणती भाषा नसते, असं भारत गणेशपुरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


महाराष्ट्रात आम्ही आमच्या कॉमेडीच्या माध्यमातून घराघरात पोहचलो मात्र हिंदीचा आवाका मोठा आहे. त्यामुळे हिन्दीच्या कॉमेडी शोमध्ये काम करताना थोडं दडपण येतंय. मात्र तेही मैदान आम्ही गाजवणार आहोत. सागर आणि मी दोघेमिळून या शोचा भाग होणार आहोत. मला कॉमेडी बघायलासुद्धा आवडते. मी चित्रपट हा समीक्षक म्हणून नाही तर प्रेक्षक आणि चाहता म्हणून पाहतो. त्यामुळे प्रेक्षकांना काय बघायला आवडतं आणि ते कोणत्या भावनेने चित्रपट बघतात हे मला  कळतं, आम्हाला प्रेक्षकांनी कलाकार बनवलं आहे. त्यामुळे त्यांना काय आवडतं याचा आम्ही विचार करतो आणि कॉमेडी करतो, असंही ते म्हणाले.