पुणे: महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. पुण्यातील काही भागांमध्ये सध्या डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे प्रमाण इतके जास्त आहे की, डासांच्या झुंडी आकाशात  फेर धरुन फिरत असल्यामुळे वावटळ निर्माण झाल्याचा भास होत आहे. सुरुवातीला डासांच्या या झुंडी पक्ष्यांचे थवे असतील, असे अनेकांना वाटले होते. पण हे पक्षी नसून इतक्या मोठ्या संख्येने डास फिरत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. केशवनगर, मुंढवा आणि खराडी  गावठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून आकाशात डासांच्या या झुंडी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने डासांच्या झुंडी फिरतानाचा प्रकार आजवर दृष्टीस पडला नव्हता. त्यामुळे डासांची 'वावटळ' पाहून स्थानिक नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. महानगरपालिकेने डासांची संख्या कमी करण्यासाठी तातडीने काहीतरी उपाययोजना कराव्यात , अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 


विशेषत:  केशवनगर येथील नदीपात्रात डासांची वावटळ दिसण्याचे प्रमाण जास्त आहे. डासांच्या झुंडी इतक्या मोठ्या संख्येने फिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या डासांमुळे मलेरिया, चिकनगुनिया डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मुंढवा, केशवनगर आणि खराडी परिसरात अनेक उच्चभ्रू रहिवाशी वसाहती आहेत. मात्र, डासांच्या झुंडीमुळे या गगनचुंबी इमारतींमधील रहिवाशांना खिडक्या उघड्या ठेवणे किंवा बाल्कनीत उभे राहणेदेखील अशक्य झाले आहे. तसेच डासांच्या भीतीने पालकांनी इमारतीखाली असणाऱ्या  बाग आणि उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळायला पाठवणे बंद केले आहे. एकूणच सध्या डासांच्या या झुंडींमुळे या परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.




आतापर्यंत अनेक स्थानिक प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली समस्या मांडली आहे. महापालिका प्रशासनाने परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. खराडी परिसरात मुळा-मुठा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नदीतील पाणी कमी करण्यासाठी मोहीम हाती घेतली असली तरी डासांचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. या भागात अनेक व्यावसायिक संकुले, गगनचुंबी रहिवाशी इमारती, स्पोर्टस कॉम्प्लेक्स आयटी पार्क, शाळा आणि वृद्धाश्रम आहे. या सगळ्यांनाच डासांच्या झुंडींचा त्रास सहन करावा लागत आहे.



डासांची संख्या अचानक का वाढली?


केशवनगर, खराडी आणि मुंढवा येथील मुळा-मुठेचे नदीपात्र डासांची सख्या वाढण्याचे मुख्य कारण आहे. या नदीपात्रालगत लहानसे धरण आणि पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे.  यामुळे नदीपात्रात जास्त पाणी साठत आहे. साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननासाठी
अनुकूल आहे. त्यामुळे याठिकाणी डासांची संख्या वेगाने वाढत आहे. यापूर्वी रशिया आणि मध्य अमेरिकेत पावसाळ्यात डासांच्या झुंडींमुळे वावटळ निर्माण होण्याचे प्रकार पाहण्यात आले आहेत. परंतु, पुण्यात पहिल्यांदाच हा प्रकार पाहायला मिळत असल्याने हा उत्सुकतेचा 
आणि चिंतेचा विषय ठरत आहे. 


आणखी वाचा


डेंग्यूचा डास कसा असतो? दिवसातून कोणत्या वेळी तो सर्वात जास्त चावतो? जाणून घ्या


डास चावल्याने मुलाचा मृत्यू झाला, विम्याचे पैसे मिळावे म्हणून आईची न्यायालयात धाव; न्यायाधीश म्हणाले....