कोलकाता: डास चावल्याने झालेला मृत्यू हा कोणताही अपघात नाही, त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यानंत जो विमा मिळतो तो मिळणार नाही असं कोलकाता उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. डास चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटंबीयांनी विमा रक्कम मिळावी अशी मागणी करत न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे स्पष्ट केलं. 


कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मौसमी भट्टाचार्य यांनी डिसेंबर 2021 मध्ये डेंग्यूने मरण पावलेल्या एका लष्करी जवानाच्या आईने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. याचिकेत 09 सप्टेंबर 2022 रोजीचे विमा कंपनीचे पत्र रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये कंपनीने याचिकाकर्त्याच्या मुलाच्या मृत्यूच्या कारणामुळे अपघाती विम्याचा दावा स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. 


कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले की, भारतात डासांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विमा भरपाईचा दावा करणे हा 'अपघात' म्हणता येणार नाही. 


छयन मुखर्जी हे भारतीय लष्करात सेवेत होते. 20 डिसेंबर 2021 रोजी कोलकाता येथील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. 12 डिसेंबर 2021 रोजी छयन मुखर्जी यांना थंडी वाजून जास्त ताप आला आणि ते डेंग्यू NS1 Ag पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. अखेर 20 डिसेंबर 2021 रोजी आजारपणात त्यांचा मृत्यू झाला.


मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे दावा दाखल केला. मृत्यूचे कारण गैर-अपघाती आहे आणि त्यामुळे त्याला पॉलिसी अंतर्गत समाविष्ट नाही या आधारावर कंपनीने हा दावा नाकारला. त्या नंतर छयन मुखर्जी यांच्या आईंने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विमा कंपनीच्या नकाराला आव्हान देत पत्र रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. 


याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या वकिलाने असा युक्तिवाद केला की त्यांचा दावा विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे. त्यांचा विमा हा विशेषतः संरक्षण कर्मचार्‍यांसाठी तयार करण्यात आला होता. त्यामध्ये पुढे असे नमूद करण्यात आले की मृत्यूचे प्राथमिक कारण निव्वळ अपघाती आहे, कारण याचिकाकर्त्याच्या मुलाला कमांड हॉस्पिटलमध्ये डेंग्यूची लागण होईल याचा अंदाज आला नव्हता.