(Source: Poll of Polls)
Yuva Sangharsha Yatra Rohit Pawar : गावात पुढाऱ्यांना 'नो एट्री'; मराठा समाजाने रोहित पवारांची यात्रा तळेगाव ढमढेरेमध्ये थांबू दिली नाही, मात्र...
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. ही यात्रा पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे आली असता या गावात पुढाऱ्यांना नो एन्ट्री असल्याने रोहित पवारांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थांबू दिलं नाही.
पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची (Yuva Sangharsha Yatra) युवा संघर्ष यात्रा (NCP) सुरु झाली आहे. ही यात्रा पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे आली असता या गावात पुढाऱ्यांना नो एन्ट्री असल्याने रोहित पवारांना (Rohit Pawar)मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थांबू दिलं नाही. मात्र रोहित पवारांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी अन्नत्याग केला असल्यानं मराठा समाज या संघर्ष यात्रेत सहभागी झाला, त्यांनी गावाच्या वेशीपर्यंत ही यात्रा सोडली. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने यावेळी संवेदनशीलता दाखवल्याचं दिसून आलं.
रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. आज ही यात्रा सकाळी तळेगाव ढमढेरेमध्ये पोहचली होती. त्यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या या यात्रेला संवेदनशीलता दाखवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठे आक्रमक झाले आहे. राज्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच पुण्यातील गावातदेखील पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची सभा किंवा गावात पुढाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही आहे. त्यात रोहित पवारांची ही यात्रा गावात आली होती मात्र मराठ्यांनी थांबण्यास नकार दिला.
रोहित पवारांचा एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा शुक्रवारीही शिरूर तालुक्यातच असणार आहे, त्या दरम्यानही त्यांनी अन्नत्यागाचा निर्णय घेतला आहे. सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.
पिंपरी-चिंचवडचे मराठे आक्रमक
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे मराठे एकवटले आहेत आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाज मागील 40 वर्षापासून आंदोलन करत आहे. हा समाज शेतीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेडसांड होते आहे आणि त्यांना नाहक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. ही सगळी परिस्थिती पाहून जरांगे पाटलांनी 17 दिवसांचं आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर 40 दिवसाची मुदत दिली होती. मात्र सरकारने त्यावर काहीही उत्तर दिलं नाही. समाजाला पाठिंबा देण्याचं उपोषण करा आणि त्यासोबतच सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी अनेक गावात बंदी घातली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेऊ नये अन्यथा समाजाकडून कार्यक्रमाला विरोध केला जाईल, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
ही बातमी वाचा: