Maratha Reservation: मराठवाड्यात येणाऱ्या बसेस थांबवल्या, पुण्यातील 600 एसटी बसाल ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल
Maratha Reservation : पुण्यातून जाणाऱ्या 600 पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावातील गावकऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारच्या घटनेनंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. तर अनेक ठिकाणी एसटी बसेस (ST Bus) फोडण्यात येत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बस सध्या डेपोतच उभ्या असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातून (Pune) जाणाऱ्या 600 पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. या आंदोलनामुळे बस जाळपोळीच्या घटना घडत असल्याने प्रवासी आणि एसटीसह एसटीचे कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या 16 गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ऐनवेळी ही परिस्थिती उद्भवल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पुसद मार्गे जाणाऱ्या मराठवाड्यातील गाड्या सध्यास्थिती स्थगित करण्यात आल्या असून, मराठवाड्यातून सुद्धा बसेस यवतमाळ जिल्ह्यात येण्याचे थांबवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. परंतु आंदोलनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुसद आगाराने दिली आहे.
पुण्यातून येणाऱ्या बसेस रद्द...
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज दुसऱ्या दिवशी देखील राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आज अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून, गाड्यांची जाळपोळ करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि एसटी बस यांचे होणारे नुकसान पाहता पुण्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या अनेक बसेस थांवण्यात आल्या आहेत. अंदाजे 600 बस आज थांबवण्यात आल्या आहेत. तर आज सकाळपासून सोलापूर, जालना, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, अवसाकडे जाणारी एकही बस पुण्यातून सुटलेली नाही. रोज तेरा ते पंधरा हजार प्रवासी या मार्गावर प्रवास करत असतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि जाळपोळ होऊ नये याची काळजी घेत या बस पुण्यातच थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचं बघायला मिळत आहे. आज रविवार असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावर गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना, बस नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही प्रवासी कालपासून गावाकडे येण्यासाठी बस स्थानकावर चकरा मारत आहे. तसेच या बस पुन्हा कधी सुरु होणार याबाबत अजुन कोणतेही अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून मिळत नाही.
औरंगाबाद-जालना बससेवा बंद...
दरम्यान, जालना येथील घटनेनंतर होणाऱ्या आंदोलनाची दखल घेत औरंगाबाद मुख्य बस स्थानक आणि सिडको बस स्थानक येथून जालन्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर बीडकडे जाणाऱ्या बस देखील सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे औरंगाबादहून मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बस सध्यातरी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maratha Reservation : कोठे बाजारपेठ तर कुठे गाव बंदची हाक; पाहा औरंगाबाद जिल्ह्यातील आजची परिस्थिती