पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात हे बोगस हेअर ट्रान्सप्लांटचं रॅकेट सुरु असल्याची  माहिती समोर आली आहे.  आरोपींनी तीन वर्षाच्या काळात तब्बल तीनशे जणांची हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केली. अखेरीस पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. 


एखाद्या व्यक्तीला टक्कल असेल किंवा डोक्यावर केस कमी असतील तर आत्मविश्वास कमी होतो. गेलेले केस परत आणण्यासाठी काहीजण  किंमत मोजण्यासाठी तयार असतात.  यासाठी खरंतर हेअर ट्रान्सप्लांटचा पर्याय अवलंबला जातो. परंतु हेअर ट्रान्सप्लांट करणं किती सुरक्षित आहे याचा विचार करण्याची गरज आता आली आहे. कारण पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात बोगस हेअर ट्रान्सप्लांट रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बोगस डॉक्टरसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह असं अटक केलल्या मुख्य आरोपीचं नाव आहे. 


 विमाननगर परिसरात हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अॅन्ड अस्थेटिक स्टुडिओ नावाचं क्लिनिक आहे. त्याच ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून केस नसलेल्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांची आर्थिक फसवणूक करणे हे तीन वर्षांपासून सुरू होतं.. हेअर ट्रान्सप्लांट करताना खरतर भूल देणे गरजेचे असते. परंतु यातील एकाही आरोपीकडे भूल देण्याचं ज्ञान नव्हतं. तरीसुद्धा आरोपींनी आतापर्यंत अनेकांना भूल देऊन त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल तीनशे जणांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी बहुतांश ग्राहकांकडून रोख रक्कम स्विकारली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना  8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :