Pesticide Child Death : चिमुकल्यांची काळजी घेताना थोडीही चूक झाली तर त्याचे परिणाम किती भयंकर असतात याचा प्रत्यय नागपुरातील पाटील कुटुंबियाना आला आहे. शेतीकामासाठी आणलेला किटकनाशकाचा डबा घरातील लहानग्यांच्या हाती लागू नये म्हणून तो सावधगिरीने रॅकमध्ये ठेवला. दुर्दैवाने मांजरीने रॅकमधील तो डबा खाली पाडला, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
या दुर्देवी घटनेमुळे नागपुरातील समता नगरात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांच्या घरी शोककळा पसरली आहे. घरातील सर्वात लहान सदस्य, अवघ्या पंधरा महिन्याचा रियांश पाटील एका मांजरीने केलेल्या घाताला बळी पडलाय. व्यवसायाने भाजीविक्रेते असलेल्या रियांशच्या वडिलांनी कौटुंबिक शेतीकामासाठी एन्डोसल्फॉन हे कीटकनाशक घरी आणून ठेवले होते. घरातील दोन लहान मुलांच्या हाती ते लागणार नाही अशी सावधगिरी बाळगत फारसं वापरात नसलेल्या आणि शेतीची अवजारे ठेवली जातात. त्या खोलीमध्ये किटकनाशकाचा डबा एका रॅकमध्ये ठेवला होता. मात्र, एवढी सावधगिरी बाळगून ही दुर्दैवानं पाटील कुटुंबियांना गाठलेच. रॅकवर ठेवलेला किटकनाशकाचा डबा मांजरीनं खाली पाडला, त्यातील द्रव जमिनीवर पसरला. नेहमीच पाण्यात खेळण्याची आवड असलेला रियांश त्या द्रव स्वरूपातील किटकनाशकाला पाणी समजून त्यामध्ये खेळला... कीटकनाशक लागलेले हात त्याने नाकातोंडात ही लावले आणि काही वेळाने त्याला भोवळ आली. कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
15 महिन्याच्या रियांशच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र कीटकनाशक किंवा त्यासारखे इतर विषारी पदार्थ घरी ठेवू नये... ठेवल्यास ते लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशा कुलूपबंद अवस्थेत ठेवावे असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे. नागपुरातील या प्रकरणात पाटील कुटुंबियांनी घरातील विषारी कीटकनाशक त्यांच्या दोन लहान मुलांच्या हाती पडणार नाही... यासाठी आवश्यक काळजी घेतली होती... तो डबा मुलांपासून दूर आणि जास्त उंचीवर ठेवला होता. मात्र, मांजरीने तो डबा खाली पाडला आणि पाटील कुटुंबियांच्या लाडक्या रियांशचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे लहानग्यांची काळजी घेताना किती सावधगिरी आवश्यक आहे हेच या घटनेतून समोर आले आहे.