Maharashtra Pune Crime News : पुण्यात महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फी बाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण करण्यात आली आहे. पुणे- बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत ही घटना घडली. पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. मात्र पालकांच्या आरोपांवर अद्याप क्लाईन मेमोरियल शाळेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणं मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरनं मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याच्या बिबेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूलमध्ये हा प्रकार घडलाय. संबंधित पालकानं या प्रकरणी तक्रार दिली असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश पांडुरंग गायकवाड (49) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचं मंगेश गायकवाड यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या आवारातच जर आपलं म्हणणं मांडण्यासाठी गेलेल्या पालकांना अशाप्रकारे मारहाण होत असेल, तर हे खूपच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. करमेना तक्रारदार हे बिबेवाडी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :