Maharashtra Beed Crime News : मागच्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात आधीपासूनच ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः वाभाडे निघत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर ते बीडचे जिल्हा पोलीस अधिक्षक आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. पण यामुळे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मात्र काही केल्या थांबायला तयार नाही. आता तर चोरांनी थेट पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी करून पोलिसांना आव्हान दिलं आहे.
जिथे आमदारच सुरक्षित नाहीत...
केजमधील भाजप आमदार नमिता मुंदडा यांच्यासोबत मद्यपान केलेल्या दोन ते तीन जणांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार मुंदडा यांनी याची तक्रार पोलिसांकडे केली. मात्र एक महिन्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं नाही, असा आरोप नमिता मुंदडा यांनी केला होता. त्यामुळे ज्या जिल्ह्यात स्वतः आमदारच सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
पोलिसांच्याच घरी चोरी तिथं सर्वसामान्यांचे काय?
बीड जिल्ह्यात महिला आमदार सुरक्षित नाही. तिथं जिल्ह्यातील इतर महिला आणि मुलींचं काय? असा प्रश्न विचारला जात असतानाच चोरांनी पोलिसांच्याच घरी चोरी केल्यानं जिथं पोलिसांचीच घरं चोरांपासून सुरक्षित राहू शकत नाही. तिथं सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.
सहाय्यक पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या घरी चोरी
अंबाजोगाईत शहरात राहणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांचं घर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अंबाजोगाईतील अप्पर अधीक्षक कार्यालयात वाचक या पदावर सध्या एपीआय रवींद्र शिंदे हे कार्यरत आहेत. ते अंबाजोगाई शहरातील पोखरी रोड परिसरातील पिताजी सारडा या कॉलनीमध्ये राहतात. चोरीची ही घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. तीन मार्च रोजी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बीडला गेले होते. 7 मार्च रोजी रात्री 11 वाजता ते घरी परतले असता त्यांना घराची कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर घरात जाऊन पहिलं असता चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेलं मिनी गंठन, नेकलेस, झुंबर, टॉप्स असं 10 तोळे सोन्याचे दागिने आणि तीन घड्याळं असा एकूण 1 लाख 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. गेवराईमध्ये एकाच परिसरामध्ये पाच ठिकाणी चोरी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. अंबाजोगाई शहरामध्ये एका व्यापाऱ्याचे दहा लाख रुपये चोरट्यांनी पळवलं होतं. त्या कोणत्याही चोरीचा तपास अद्याप पोलिसांना करावा लागलेला नाही. किमान पोलिसांच्या घरी चोरी होऊन आता 48 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी या चोरी याप्रकरणी अद्यापही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे जिथं पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथं सर्वसामान्यांची सुरक्षा कोणी करायची? असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :