Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांकडून गुंडगिरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे, हे तरुण हातात कोयता घेऊन ठिकठिकाणी दहशत माजवताना दिसत आहेत, यावर पुणे पोलिसांनी (Pune Police) कारवाई करत नागरिकांना भयभीत करणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
पोलिसांच्या माहितीनुसार पुण्यातील येरवडा भागात 5 जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केलीय. या संदर्भात 40 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवर त्वरित अॅक्शन घेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केलीय. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते
40 वर्षीय महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि या प्रकरणातील आरोपी एकमेकांना ओळखत असून फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची कोयत्यांनी तसेच दगडांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना "तुम्ही याठिकाणी थांबू नका, नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही" अशी धमकी देवून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली. या संदर्भात पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.
पुण्यात वाढतंय गुन्हेगारीचं प्रमाण, महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे, एकीकडे शहरात गुंडगिरी करणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर दुसरीकडे अंगावर काटा आणणारी घटना घडलीय. पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील खराडी भागातील धक्कादायक घटना आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने घटना टळली, पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केलाय. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी काही जण रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.
प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची डिजीटल नजर
पुण्यातील गुन्हेगारी वाढत चालली असून ती थांबवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता कंबर कसली आहे. सगळ्या अट्टल गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर, पोलिसांनी आता सगळ्या गुन्हेगारांची प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येक गुन्हेगारावर पोलिसांची डिजीटल नजर देखील असणार आहे.
हेही वाचा>>>
पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद