Pune Crime News : मागील काही दिवसांत पुणे (Pune) शहरातील गुन्हेगारीच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार पुणे शहरात समोर आला असून, या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. 


पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. ज्यात गाडीच्या काच्या फोडण्यात आल्या. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला. ज्यात चारचाकी गाडीचा सीट जळाले असून, महिला सुदैवाने वाचली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 


घटना सीसीटीव्हीत कैद...


पुण्यातील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ज्यात दहा ते पंधरा जणांचं टोळकं वेगवेगळ्या दुचाकीवरून महिलेच्या गल्लीत येतात. वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभा करून ते महिलेच्या घराकडे जातात. विशेष म्हणजे सर्वांच्या हातात लाठ्या-काठ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी तोंडाला रुमाल बांधल्याचे पाहायला मिळत आहे. हे सर्व टोळकं महिलेच्या घरासमोर उभा असलेल्या चारचाकी गाडीवर हल्ला करतात. गाडीची तोडफोड केल्यावर काहीजण लगेचच पळून जातात. याचवेळी यातील एकजण महिलेच्या दिशेने पेट्रोल फेकतो. तसेच, हातातील माचीस पेटवून ती महिलेच्या घराकडे फेकतो. मात्र, संबंधित महिला घरात पळून गेल्याने कारला आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. जर महिला घरात पळून गेली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्वच आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


काय आहे प्रकरण? 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांच्यामध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता. 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि 13 जणांनी येऊन राजे यांची एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केले. त्याठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. महेश राजे यांची भाडेकरू असलेल्या महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या, त्यामुळे या महिलेच्या अंगावर सुद्धा आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने तेथून पळ काढल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


पोलीस चौकीसमोरच स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू; पुणे शहरातील धक्कादायक घटना