पुणे : राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती (Shivaji Maharaj Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्स सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर देखील भाष्य केले आहे. 'उद्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी (OBC) समाजाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा उपोषण करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकारने उद्या (20 फेब्रुवारी) रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल अधिवेशनात मान्य केला जाणार असून, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे उद्याच्या अधिवेशनात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लगले आहेत.
सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करा : मनोज जरांगे
सरकारने उद्या मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावले असून, स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मात्र सगेसोयरे अध्यादेश उद्याच्या अधिवेशनात मान्य करून, त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र आरक्षण यापूर्वी देखील देण्यात आले आणि ते न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे पुन्हा असेच झाल्यास आम्हाला परत यासाठी लढा द्यावा लागणार. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाचाच कायदा केल्यास त्याचा अधिक फायदा मराठा समाजाला होईल आणि न्यायालयात देखील टिकेल असे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्याच्या विशेष अधिवेशनात स्वतंत्र आरक्षणाचा निर्णय होणार की, सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा केला जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
युनोस्कोमधे अकरा गड किल्ल्यांची नोंद
किल्ले शिवनेरी येथील आपल्या भाषणातून बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "शिवछत्रपती जेवढे धार्मिक तेवढेच विज्ञाननिष्ठ होते. महाराजांनी धर्म किंवा पंथ यांचा विचार न करता स्वराज्य स्थापन केले. छत्रपती म्हणजे नियतीला पडलेले सुंदर स्वप्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचे शिल्प लावले. आम्ही जमेल तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करत असतो. युनोस्कोमधे अकरा गड किल्ल्यांची नोंद झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दांडपट्टा हा राज्याचा खेळ म्हणून जाहीर केलाय, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :