Pune Blast : पुण्यातील स्फोटाचं गूढ; वॉशिंग मशिन दुरुस्त करणाऱ्याच्या घरी स्फोट; एका व्यक्तीला अटक
Maharashtra Pune Blast Updates : पुण्यातील भवानी पेठ परिसरात वॉशिंग मशिन दुरुस्त करणाऱ्याच्या घरी स्फोट झाला असून रशीद मोहम्मद अली शेख नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
Maharashtra Pune Blast Updates : पुण्यातील (Pune) भवानी पेठ (Bhawani Peth) सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावर स्फोट झाला. वॉशिंग मशीन रिपेअर करताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे (Pune) पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
पुण्याच्या भवानी पेठेत काल संध्याकाळी झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. रशाद मोहम्मद अली शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. मूळचा मुंबईचा आणि पेशानं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेला रशाद गेले अनेक महिने या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याचा वॉशिंग मशीन, ओव्हन रिपेअरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती लागली. ही दुरुस्ती सुरू असतानाच स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी काल रशाद शेखच्या फ्लॅटमधून काही सिम कार्ड्स आणि पासपोर्टही जप्त केल्याची माहिती आहे. काल संध्याकाळी भवानी पेठेतल्या विशाल सोसायटीत स्फोट झाला होता. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, सोसायटीतल्या अनेक फ्लॅट्सच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातील भवानी पेठेत काल (रविवारी) संध्याकाळी स्फोट घडल्याची घटना घडली. या भागांत असणाऱ्या विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. रशाद मोहम्मद अली शेख असं या फ्लॅटधारकाचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
पंतप्रधानांच्या देहू दौऱ्यापूर्वी महाराष्ट्रात हाय अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या म्हणजेच, 14 जून रोजी पुण्यातील देहूमध्ये (Dehu) येणार आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकाच्या सूचनेनंतर मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आल्यामुळे रात्री शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत दाखल होणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. संशयित व्यक्ती, गाड्या यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कुठे कुठे आणि मध्यरात्री का प्रवास केला जात आहे याची माहिती घेतली जात आहे.