Shivajirao Adhalrao Patil : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2009 मध्येच युती होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.  ही युती शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी होणार होती. मात्र, ही युती का फिस्कटली याची माहितीदेखील आढळरावांनी दिली. 


शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिंदे गटाने स्थापन केलेल्या कार्यकारणीत त्यांना स्थान देण्यात आले आहे. शिंदे गटात प्रवेश का केला, याची माहिती देण्यासाठी शिरूरमध्ये समर्थकांची बैठक बोलावली होती. यावेळी आढळराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. 


शिवसेना-राष्ट्रवादी युती


2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती जवळपास अंतिम झाली होती, असा गौप्यस्फोट  शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, संजय राऊत मला म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत. 


युतीची बोलणी सुरू असताना दोन दिवसांनी शरद पवार यांची सभा आहे, तीदेखील रद्द करायला सांगा असे आपण राऊत यांना सांगितले. त्यावर राऊत यांनी आता आपण त्यांना (पवारांना) कसं काय सांगणार? मग मी म्हणालो, मला का सांगताय, असं म्हणून मी निघून आलो. काही वेळानं फोन आला, उद्धव ठाकरे साहेब येत आहेत, सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती अशी माहिती आढळराव यांनी दिली. 


युती फिस्कटली कशी ?


या सगळ्या प्रकाराची माहिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली. त्यानंतर शरद पवार यांनी युतीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. अन्यथा आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009 मध्येच झाली असती, असेही त्यांनी सांगितले. 


अजित पवार म्हणाले, जिल्हा परिषद कोणाची? आम्ही म्हटलं नागरिकांची, तर ते म्हणाले... : शिवाजीराव आढळराव


"पंचायत समिती सभापतींच्या निवडणुकीवेळी वाद झाले. माजी सभापती आणि शिवसैनिकांना अटक झाली. उद्धव ठाकरेंना मी सांगितलं पण काही फरक पडला नाही. दिवंगत आमदार सुरेश गोरेंनी पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी आणला. त्यात ही अडवणूक झाली. शेवटी अजित पवारांना भेटायला लागलं. ते म्हणाले जिल्हा परिषद कोणाची आहे? आम्ही म्हटलं नागरिकांची. तर ते म्हणाले राष्ट्रवादीची आहे. त्यामुळं आमदार दिलीप मोहिते म्हणतील तशीच इमारत होईल. तरी आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवला. कोरोना काळात मुंबईच्या दालनात अजित पवारांनी बैठक बोलावली. तिथून येताना आपले आमदार सुरेश गोरेंना कोरोनाची लागण झाली, यातूनच त्यांचा मृत्यू झाला. तरी ही अद्याप इमारत उभी नाही. आज ही अजित पवार म्हणत होते, आमदार दिलीप मोहितेंच्या म्हणण्यानेच त्या जागेवरच इमारत होईल.", असं शिवाजीराव आढळराव म्हणाले.