नवी मुंबई : अहमदाबादमधील मेघानीनगर भागात एअर इंडियाचं फ्लाइट एआय 171 कोसळलं. या विमान दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. एअर इंडियाचं विमान अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक एअरपोर्टला निघालं होतं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यामध्ये महाराष्ट्रातील मैथिली पाटीलनं ( Maithili Patil) देखील जीव गमावला. मैथिलीनं खूप संघर्ष करत एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर तिला एअर इंडियात नोकरी लागली होती.
पनवेल तालुक्यातील न्हावा गावच्या मैथिलीनं जीव गमावला
अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची मैथिली पाटीलचा समावेश आहे. क्रू मेंबर्समध्ये हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश आहे. मैथालीच्या पश्चात आई - वडील , बहिण आणि भाऊ असा परिवार आहे. मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले होते. दोन वर्षांपूर्वी तिने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात नोकरी सुरु केली होती. आजच्या घटनेनं पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचा मृत्यू
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे हिचा मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती.
सोलापूरमधील पवार दाम्पत्याचा मृत्यू
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले महादेव तुकाराम पवार( वय वर्ष 67 ) आणि त्यांच्या पत्नी अशा महादेव पवार (वय 55 ) हे दोघे पती पत्नी सांगोला तालुक्यातील हातीद गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचा एक मुलगा अहमदाबाद मध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करत असल्याने ते सध्या अहमदाबाद येथे स्थायिक झाले होते. लंडनच्या मुलाला भेटण्यासाठी हे दोघे लंडनला चालले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मागच्या पंधरा दिवसांमध्ये हे दोघे हातीद या त्यांच्या मूळ गावी भावांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक मुलगी, दोन मुले आहेत.
दरम्यान, एअर इंडियाच्या एआय 171 फ्लाइटनं अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर ते काही सेकंदात कोसळलं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडाचा व्यक्ती होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी अपघातात बचावलेल्या एका व्यक्तीची भेट घेतली. विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं, त्यामुळं कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही, असं म्हटलं.
