मुंबई : अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एअर इंडियाचं विमान लंडनच्या गॅटविक एअरपोर्टकडे निघालं होतं. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या 50 सेकंदात ते दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात 230 प्रवासी आणि 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 व्यक्ती होते. यापैकी एक जण बचावला आहे. विश्वशकुमार रमेश असं त्या व्यक्तीचं नाव असून तो ब्रिटीश नागरिक आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेवर क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे.
विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी एअर इंडिया विमान दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. या घटनेत विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. विराट कोहलीनं या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. अनुष्का शर्मानं देखील भावनिक संदेश शेअर केला आहे.
विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यानं म्हटलंय "आज अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानं धक्का बसला आहे, या घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो." अनुष्का शर्मानं म्हटलं की " आज अहमदाबाद येथील विमान अपघाताची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. सर्वांसोबत माझी प्रार्थना आहे."
एअर इंडियाच्या एआय -171 या फ्लाइटनं अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळवरुन उड्डाण केलं होतं. विमानानं उड्डाण घेतल्यांनतर ते 1000 मीटर अंतरापर्यंत देखील झेप घेऊ शकलं नाही. ते मेघानीनगर भागात बीजे मेडिकल कॉलेजच्या होस्टेल आणि सिव्हील हॉस्पिटलच्या टीबी विभाग येथे क्रॅश झालं. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यानं विमानातील प्रवाशांसह इतर व्यक्तींचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 200 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. एअर इंडिया ही टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे. टाटा ग्रुपनं या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. या घटनेत जे जखमी झाले आहेत त्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च देखील टाटा ग्रुपकडून केला जाईल. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर्स होस्टेलची दुरुस्ती देखील करण्यासाठी टाटा ग्रुप सहकार्य करेल, असं सांगण्यात आलं.