पुणे : पुण्यात कोरोनामुळे आणखी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. हडपसर परिसरात राहणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हडपसर परिसरात शोककळा पसरली आहे. परंतु नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कोरोनाविषयक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.


श्याम कुचेकर हे हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाअंतर्गत मुकादम म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच श्याम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या आई-वडील आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात उपचार सुरु असताना एका पाठोपाठ एक असा या चारही जणांचा मृत्यू झाला.



श्याम कुचेकर यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आईला जहांगीर हॉस्पिटलमध्ये, तर वडिलांना बाणेर येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये आणि भाऊ विजय हे शिवाजीनगर इथल्या जम्ब कोविड सेंटर उपचारांसाठी दाखल झाले होते. कोरोनासोबत लढा देताना 9 एप्रिल रोजी लक्ष्मण कुचेकर यांनी प्राण सोडले. त्यानंतर आई सुमन यांचा 16 एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आई वडिलांच्या मृत्यूची माहिती श्याम यांना देण्यात आली नव्हती. मात्र श्याम यांची प्रकृती खालावली होती. सहा दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी म्हणजेच 22 एप्रिल रोजी दुपारी श्याम यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये  शोककळा पसरली होती.


श्याम कुचेकर यांचा अंत्यविधी हडपसर गाव इथल्या विद्युतदहिणीत करत असतानाच बाणेर येथे उपचार घेत असलेल्या त्यांचा भाऊ विजय यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. अशाप्रकारे कोरोनाने एक अख्खं कुटुंबच हिरावलं.