पालघर : कोरोनाने ग्रामीण भागातही थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत. अख्खं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त होत असल्याचं चित्र आहे. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील माय-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे ठाकरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 


आईचा कोरोनामुळे मृत्यू, वडील रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत, पत्नी आणि मुलीलाही लागण आणि अशा अवस्थेत आईच्या बाराव्या विधीला अवघ्या 34 वर्षाच्या सागरचा कोरोनाने मृत्यू अशी हृदय हेलावून टाकणारी घटना वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात घडली असून या घटनेने कोरोनाचे गांभीर्य आणि भीती अधिक गडद केली आहे.


ऐनशेत गावातील सरिता सदानंद ठाकरे एका महिलेला आणि तिच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर पतीला रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये तर पत्नीला भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सरिता यांचा उपचारादरम्यान 10 एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी कल्याण येथे दाखल करण्यात आले. 
 
सागरची प्रकृती सुधारत असताना अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. माय-लेकराच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे. सागरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वाडा तालुक्यात कोरोनाचा हा 60 वा बळी असून वाडा तालुक्यात कोरोनवर उपचार होईल, अशा अत्याधुनिक व्यवस्था वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.