मुंबई : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि नॅकचे संस्थापक डॉक्टर अरुण निगवेकर यांचे पुण्यात निधन झाले आहे.  79 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. 


गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगामुळे आजारी होते.  भौतिकशास्त्र (फिजीक्स) विषयातील शास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर डॉक्टर निगवेकर यांनी काही वर्षं  स्विडनमधे काम केलं. त्यानंतर ते भारतात परतले आणि भारतातील शिक्षण पद्धती आधुनिक बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशातील शिक्षण पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू  करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र गमावला : मुख्यमंत्री


भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षण तज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर बहुआयामी होते. विनयशील स्वभावाच्या डॉ. निगवेकर यांनी पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीभिमुख असे काम केले. भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण प्रवाह आणण्यासाठी त्यांनी 'नॅक' सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला. देशातील संगणक तंत्रज्ञान आणि नागरी सेवा क्षेत्रातील शिक्षणाच्या दर्जात्मक सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत.  भारतातील उच्च शिक्षणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र आपण डॉ. निगवेकर यांच्या निधनामुळे गमावला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली


ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर सरांनी देशातील शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आयुष्यभर त्यांनी पदार्थ विज्ञानासारख्या कठीण विषयात संशोधनासह अध्यापनाचे अनमोल कार्य केले. पुणे विद्यापीठात शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आणि त्याचा लौकीक वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुलगुरु म्हणून काम करताना त्यांनी पुणे विद्यापीठाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘नॅक’चे संशोधन संचालक म्हणून डॉ. अरुण निगवेकर सरांनी भारतातील व्यापक आणि क्लिष्ट अशा उच्चशिक्षण पध्दतीसाठी गुणवत्ता मापन करण्याची सरळ आणि सोपी पध्दत विकसीत केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिल. शैक्षणिक क्षेत्रातील बदलांचा अचूक वेध घेत काळाच्या दोन पाऊले पुढे चालत त्यांनी ‘व्यास’ ही देशातली पाहिली शिक्षण वाहिनी सुरु केली. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. निगवेकर सरांचे कार्य कायमच प्रेरणा देत राहील, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.     


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची श्रद्धांजली 


विद्यार्थीदशेपासून मी डॉ. अरुण निगवेकर सरांना ओळखत होतो. ते भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापक होते, त्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख झाले आणि त्यानंतर कुलगुरू झाले. अडीच वर्षे त्यांनी कुलगुरू पदावर काम केले त्यांनतर त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एकंदरीत सर जमिनीवर राहून सर्वांशी आपुलकीने मिळून मिसळून काम करणारे ते होते. 'इंडियन सायन्स कॉग्रेस' ही त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. एक चांगले प्रशासक, चांगले शिक्षक, मितभाषी असे व्यक्तिमत्व होते. मी कुलगुरू असताना माझ्या कार्यकाळात त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन दिले. त्यांचे जाणे ही शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे. माझ्याकडून व विद्यापीठातील माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे मी श्रद्धांजली अर्पित करतो.