Pune Crime News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Pune crime news) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रशांत धनपाल गांधी या व्यक्तीला  ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखा वाहतूक शाखा आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. 


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरून गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित कार थांबवली. त्यानंतर या वाहनाची झडती घेतली असता वाहनात असलेल्या काही बॅगेत तब्बल 3 कोटी 42 लाख 66 हजार रुपये मिळून आले. त्यानंतर पोलिसांनी ही रोख रक्कम आणि ही गाडी हडपसर पोलीस स्टेशन येथे आणली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रशांत गांधी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही रक्कम राहत्या घरातून लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रोख रक्कम त्याला कर्जापोटी भरायची आहे असे त्याने सांगितले. पोलीस अधिक तपास करत आहेत.


गाडीतील व्यक्तीच्या हालचालींमुळे संशय


हडपसर परिसरातील शेवाळेवाडी परिसरात असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ पोलिसांकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी एका ब्रिझा गाडीतील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या . त्यानंतर गाडीची झडती घेण्यात आली. गाडीच्या डिक्कीत काही बॅग संशयास्पद दिसू लागल्या. पोलिसांनी या बॅगची तपासणी केली असता त्या रोख रक्कम सापडली. त्यानंतर गाडीसह चालकाला पोलिस स्टेशनला आणण्यात आले.  संशयित ब्रिजा कार MH 13 CK 2111 ही ताब्यात घेऊन संशयित इसमाला हडपसर पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्याकडून सगळी रक्कम जप्त करण्यात आली. 


कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई


येत्या काही दिवसांत कर्नाटकच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकातील वेगवेगळ्या शहरात सभा घेत आहेत. या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच हडपसरमध्ये पुणे पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. कर्जासाठी रक्कम भरायची आहे, असं सांगण्यात आलं आहे. मात्र नेमकं प्रकरण काय आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. 


हे ही वाचा :


Karnataka Assembly Elections 2023 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 88 लाखांची रोकड जप्त, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई