Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर (Maharashtra Karnataka Border) 88 लाख रुपयांची रोकड असलेली कार पोलिसांनी पकडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील तोळनूर गावातील चेक पोस्टवर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. 


चेक पोस्टवरुन कर्नाटकात जाणाऱ्या गाडीत रोख रक्कम आढळली


कर्नाटक निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्राने कर्नाटक सीमेवर पोलिसांनी चेक पोस्ट तयार केले आहेत. या चेक पोस्टवरुन कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. काल (5 मे) रात्री उशिरा एम. एच. 13 डीजे 7545 ही कार तोळनूर चेक पोस्टवर पोलिसांनी अडवली. गाडीची तपासणी केली असताना लोखंडी पेटीत 88 लाख रुपयांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आली. 


गाडी आणि रोकड ताब्यात


गाडी चालकाला या रकमेसंदर्भात विचारले असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर एटीएममध्ये ही रक्कम भरण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी या संदर्भात त्याला पुरावा मागितला असता त्याने कोणताही पुरावा सादर केला नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडी आणि रोकड ताब्यात घेतले असून आयकर विभागाला या संदर्भात कळवण्यात आले आहे. आयकर विभागाच्या चौकशीनंतर या रकमेचे पुरावे असल्यास सोडण्यात येईल अन्यथा गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिली.


प्रणिती शिंदे यांची सभा उधळली


बेळगावात देसूर इथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांची सभा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उधळली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी देसूर इथे प्रणिती शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन सभेच्या ठिकाणी जाऊन सभा उधळली. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रणिती शिंदे यांना सभा न घेताच परत जावे लागले. महाराष्ट्रातील नेते मंडळी समितीच्या उमेदवारांच्या विरुद्ध प्रचारासाठी येत असल्याने मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 मे रोजी मतमोजणी


कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.