Leopard Spotted in Pune Airport: अखेर तो सापडला! पुणे विमानतळ परिसरात बिबट्या 7 महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात, लाईव्ह कॅमेरे केले खराब तरीही मारला अचूक डार्ट
Leopard Spotted in Pune Airport: पुणे विमानतळ परिसरात वावरणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे; लाईव्ह कॅमेरे खराब केला तरीही अचूक डार्ट मारला आणि वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध केलं.

पुणे: पुण्यातील विमानतळ परिसरातील बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. एप्रिल महिन्यापासून पासून पुणे विमानतळ परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्या पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, रिस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (RESQ Charitable Trust), भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि पुणे विमानतळ प्राधिकरण (Pune Airport Authorities) यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे सुरक्षितरीत्या बेशुद्ध करून पकडण्यात आला असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
Leopard Spotted in Pune Airport: ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण
या बिबट्याने विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून आत-बाहेर हालचाल चालू ठेवली होती. विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात आले होते. बिबट्याचे सर्व संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग बंद व मजबूत करण्यात आले, अतिरिक्त live निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले आणि बोगद्याच्या आतील हालचाली अधिक अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले. काल अखेर (११ डिसेंबर रोजी) सुमारे ३० सदस्यांच्या संयुक्त पथकाने बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली, जेणेकरून नियंत्रित परिस्थितीत बेशुद्ध करण्यात आले, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
Leopard Spotted in Pune Airport: बिबट्याने दोन लाइव्ह कॅमेरे खराब केले होते
या माहितीच्या आधारे, 11 डिसेंबर 2025 रोजी सुमारे 30 सदस्यांच्या संयुक्त पथकाने एक केंद्रित योजना राबवली. वनविभाग, RESQ Charitable Trust आणि Indian Air Force पथकांनी समन्वय साधून बिबट्याला अंदाजे 80 फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली, जेणेकरून नियंत्रित परिस्थितीत त्याला शांततामयरीत्या बेशुद्ध करता येईल. अत्यंत मर्यादित जागा असूनही, वन्यजीव वैद्यक तज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी बिबट्याला यशस्वीपणे डार्ट केले. बिबट्याला त्यानंतर बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय निरीक्षणासाठी हलवण्यात आले. “या ऑपरेशनला संयम, अचूकता आणि सतत परिस्थितीचे मूल्यमापन आवश्यक होते,” असे डॉ. गौरव मंगला म्हणाले. “बिबट्याने दोन लाइव्ह कॅमेरे खराब केले होते आणि मला अत्यंत कठीण कोनातून शॉट घ्यावा लागला. पथकांनी शांत राहून अचूक नियोजनाप्रमाणे कृती केली, त्यामुळेच हे शक्य झाले.”
Leopard Spotted in Pune Airport: बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर
बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून पुढील निरीक्षणासाठी बावधन, पुणे येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवलेला आहे.
पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले, “ही मोहीम म्हणजे सक्षम समन्वय आणि तयारपणाचे प्रतीक आहे. वनविभाग, RESQ Charitable Trust, Indian Air Force आणि Airport Authority of India यांनी अनेक महिन्यांपासून सातत्याने एकत्र काम केले. संवेदनशील नागरी आणि पायाभूत सुविधांमध्येही जटिल वन्यजीव परिस्थितींना प्रतिसाद देण्याची क्षमता दाखवून दिली आहे.”
Leopard Spotted in Pune Airport: मानव आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
RESQ Charitable Trust च्या संस्थापक आणि अध्यक्ष नेहा पंचमिया म्हणाल्या, “प्रत्येक वन्यजीव rescue वेगळी असते आणि निर्णय घाईने नव्हे तर परिस्थिती, वेळ आणि योग्य रणनीतीवर आधारित असावेत. डेटा, तंत्रज्ञान आणि पथकाचा सक्षम समन्वय यामुळे मानव आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे परिणाम शक्य होतात.” अधिकाऱ्यांनी सांगितले की मोहिमेदरम्यान कोणतीही मानवी दुखापत झाली नाही तसेच विमानतळाची कामे विनाअडथळा सुरू राहिली. बिबट्याच्या दीर्घकालीन व्यवस्थापनाचा निर्णय वनविभाग निर्धारित प्रोटोकॉलनुसार घेईल. ही यशस्वी मोहीम दीर्घकाळ चाललेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रयत्नांचा यशस्वी शेवट ठरली असून, संवेदनशील नागरी परिसरात पुराव्यावर आधारित, नियोजित आणि समन्वयित वन्यजीव व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित करते.
पुणे विमानतळावर हा बिबट्या 28 एप्रिल 2025 रोजी पहिल्यांदा दिसला होता. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत तो विमानतळ परिसरातील बोगदे, दाट झाडी आणि कमी रहदारी असलेल्या परिसरात वावरत होता. या ठिकाणी भारतीय हवाई दलाची ठिकाणी असल्यामुळे आणि विस्तीर्ण भाग असल्यामुळे या बिबट्याला जेरबंद करणे आव्हानात्मक ठरत होते. अखेर त्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे.























