Pune Gautami Patil Lavni Program : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिलांच्या हाती काठ्या; अनोख्या बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत
संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटील च्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिराचीवाडी येथील यात्रेला कोणतंही गालबोट लागू नये, म्हणून चक्क महिला हातात काठी घेऊन उभ्या होत्या.
Pune Gautami Patil Lavni Program : संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ होतच असतो. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिराचीवाडी येथील यात्रेला कोणतंही गालबोट लागू नये, म्हणून चक्क महिला हातात काठी घेऊन उभ्या होत्या. वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या शोचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शांततेत पार पडलेला गौतमीचा हा पहिलाच कार्यक्रम असावा.
या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी घेतली आणि हातात काठ्या घेऊन त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खाजगी कंपनीचे सुमारे 25 बाऊन्सर ही तैनात करण्यात आले होते. याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील बंदोबस्तासाठी तैनात होता.
एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते. त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. यापूर्वी ओतुर जवळील फापाळे शिवार येथे एका लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमात गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये पिकांचे नुकसान केल्यामुळे त्यांना शेतमालकाच्या दगडांचा मार सहन करावा लागला होता. एवढेच नव्हे तर तेथे झाडावर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खाली उतरण्यासाठी गौतमीला विनवणी करावी लागली होती. मात्र पिराचीवाडी येथील वेताळेश्वर यात्रेत सुमारे पन्नास हजारपेक्षा जास्त रसिक प्रेक्षक असताना देखील गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री उद्योग समूहाचे प्रमुख सत्यवान बाळसराफ यांनी केले .
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. तिच्या एका कार्यक्रमादरम्यान कोणीतरी खिडकीतून तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला होता. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संस्कृती विसरु नका, अशा मजकूराच्या पोस्ट लिहिल्या होत्या. अनेकदा तिला विरोध करणारे तिच्या थिरकण्यावर बोट ठेवणाऱ्यांनी तिला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.
संबंधित बातमी-