पुणे : मागील काही दिवसांपासून ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) प्रकरण चर्चेत आले आहे. ललित पाटील कोणाच्या मदतीने पळून गेला आणि तो नेमका कसा पळाला?, असे अनेक प्रश्न सातत्याने विचारले जात होते. त्यातच आता ललित पाटीलचा पलायनाचा प्लॅन ससून रुग्णालयात ठरल्याची माहिती समोर आली आहे. ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांनी मिळून हा प्लॅन ठरवल्याची माहिती आहे.
ललित याला ससूनमधून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाला अटक केली आहे. ससून मधील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये ललित आणि अऱ्हानाची ओळख झाली होती. विनय अऱ्हानावर एका सहकारी बँकेची 46 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. तोही याच 16 नंबर वॉर्डमध्ये उपचारांच्या नावाखाली बंद होता. दोघांची 16 नंबर वॉर्डमधे एकमेकांशी ओळख झाली होती आणि त्यातुन विनय अऱ्हानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केल्याचं समोर आलं आहे.
ललित पाटील पळून जाण्याचा प्लॅन कसा होता?
- 2 ऑक्टोबर रोजी ललित ससून रुग्णालयामधून पळाला.
- काही अंतरावर असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ललित गेला.
- हॉटेलच्या बाहेरून त्याने रिक्षा घेत सोमवार पेठेत पोहचला.
- याठिकाणी दत्ता डोके हा ललितला घेऊन जाण्यासाठी मोटार घेऊन थांबला होता. डोके हा विनय अरहाना याच्याकडे चालक म्हणून कामास आहे
- या मोटारीतून ललित रावेतला पोचला.
- तेथे डोके याने विनय अरहानाच्या सांगण्यावरुन ललितला 10 हजार रुपये दिले.
- ललित पैसे घेऊन पहिल्यांदा मुंबईला गेला आणि तेथून नाशिकला गेल्यानंतर मैत्रिणीकडून 25 लाख रुपये घेऊन त्याने पुढचा प्लॅन बनवला.
सगळ्यांची सखोल चौकशी सुरु
ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत ललित पाटील, भुषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंद लोहारे, दत्ता डोके, विनय अऱ्हाना, अमीर आतिक शेख, प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना पोलिसांनी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे. या सगळ्यांचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यात ललित पाटीलला अरविंद लोहारे याने मेफेड्रॉन बनवण्याचे धडे दिल्याचंदेखील समोर आलं होतं. त्यात आता ससूनचे डीन संजीव ठाकूर ललितला ससूनमध्ये आश्रय देत असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर महत्वाची बातमी-