पिंपरी-चिंचवड : दागिने आणि सोन्याची बिस्कीटं द्या, अन्यथा दुकानात बॉम्बस्फोट करेन, अशी धमकी देत बंदुकीच्या धाकाने एका महिलेने सराफाला वेठीस धरलं. मात्र 72 वर्षीय सराफाच्या धाडसामुळे आरोपी महिलेला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे ही बंदूक खोटी असल्याचं नंतर उघड झालं.
पिंपरी चिंचवडच्या वर्धमान ज्वेलर्समध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सोनाली श्रीवास्तव या 38 वर्षीय आरोपी महिलेला सराफाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वर्धमान ज्वेलर्स या दुकानात ही महिला बुरखा परिधान करुन आली. सराफ मालकाला दागिने आणि सोन्याचे बिस्कीट दाखविण्याची मागणी तिने केली.
दागिने आणि बिस्कीट बाहेर काढल्याचं पाहताच, सोनालीने धमकावायला सुरुवात केली. दागिने आणि बिस्कीट दिले नाही तर दुकानात बॉम्बस्फोट घडवेन अशी धमकी तिने बंदुकीचा धाक दाखवून दिली.
हा प्रकार पाहून दुकानातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिला पकडण्यासाठी कोणीच पुढे आले नाही, मात्र 72 वर्षीय सराफ मालक भिकमचंद छाजेड यांनी जिवाची पर्वा न करता तिला पकडले आणि पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिलं.
यावेळी सोनालीने त्यांच्या हाताला चावाही घेतला. सोनाली पिंपळे सौदागर मधील द्वारकासाई सोसायटीत राहते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिलेकडील बंदूक खोटी असल्याचं समोर आलं आहे.