Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत संपेना! चप्पल दुकानदारावर कोयता हल्ला; सुदैवाने दुकानदार बचावला...
पिंपरी मार्केटमध्ये शूजच्या दुकानात दुकान मालकावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले आहेत.
पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत ( Pune Koyta Gang) संपायचं नाव घेत नसल्याचं अनेक घटनांमधून समोर येत आहे. पिंपरी मार्केटमध्ये चपलेच्या दुकानात दुकान मालकावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले. भररस्त्यावरील या दुकानात असा कोयता हल्ला केल्याने परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झालं आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालक दुकानात बसलेले असताना अचानक अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अज्ञात व्यक्ती फरार असून त्याचा उद्देश नेमका काय होता याचा तपास पोलीस करत आहे. सोमवारी रात्री घटना घडली आहे.
सीसीटीव्हीत काय आहे?
एक अज्ञात व्यक्तीने थेट चपलेच्या दुकानात प्रवेश केला आणि त्यानंतर थेट दुकान मालकावर कोयत्याने हल्ला करताना दिसत आहे. त्यावेळी दुकानातील दोघांवर सपासप हल्ला करताना दिसत आहे. यावेळी मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या दोन्ही दुकानदारांनी हे कोयत्याचे वार हुकवले. त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा होताना दिसताच हा कोयता हल्ला करणाऱ्याने दुकानातून पळ काढला आहे, असं सीसीटीव्हीत दिसत आहे.
दहशत कधी थांबणार?
काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उगारला होता. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. सध्या पुण्यात अनेक ठिकाणी कोयत्या गॅंगने दहशत माजवल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसत आहे. या प्रकरणात तीन जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोयता गँगची दहशत कायम...
पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच, यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी-