Fuel Price Hike : येत्या दोन महिन्यात पेट्रोल सव्वाशे तर डिझेल शंभरी गाठणार, तज्ज्ञांचा अंदाज
पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांवरुन ठरत आहेत. त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय.
पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती येत्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढतील. पेट्रोल सव्वाशे तर डिझेलच्या किमती शंभरच्या पुढे जातील असं पेट्रोलियम क्षेत्रातील अभ्यासकांचं भाकित आहे. एकीकडे या किमती वाढत असताना पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वाढणाऱ्या या दरांबद्दल बोलणं बंद केलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या दरांची काय कारणं आहेत आणि आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
शंभरी पार केलेले पेट्रोलचे दर आणखी वेगाने पुढे निघालेत तर डिझेलचे दर शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. येत्या दोन महिन्यामध्ये देशात कोणत्याही निवडणुका नसल्याने पेट्रोलचे दर प्रति लिटर सव्वाशे रुपयांपर्यंत पोहोचतील, असं भाकित पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेऊन असलेल्या तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा निवडणुकांशी काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर गेल्या काही दिवसांमधील या दरांमधील चढ-उतार पाहा.
- जानेवारी महिन्यात दहा वेळा दरवाढ झाली.
- फेब्रुवारी महिन्यात सोळा वेळा दरवाढ झाली.
- मात्र मार्च महिन्यात तीन वेळा दर कमी झाले आणि याच काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होता.
- एप्रिल महिन्यात देखील एकदा दरांमधे कपात झाली कारण याच काळात निवडणुका होत्या.
- मात्र निवडणुका संपताच मे महिन्यात तब्बल सोळा वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली.
- तर जून महिन्यात आतापर्यंत पाच वेळा दरांमधे वाढ झालीय.
पेट्रोल आणि डिझेलचे हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांवरुन ठरत आहेत. त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय. मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला भारतात निवडणुका असल्यावरच दर कमी करायला कसं कळतं, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर असं राजकारण होत असल्यानं नक्की दर कशामुळे वाढतायत याबाबत सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किमंत प्रति बॅरल सत्तर रुपये आहे. जेव्हा हे दर 120 ते 130 रुपये होते तेव्हा पेट्रोल सत्तरच्या आसपास होतं.
पेट्रोल आणि डिझेलच्या या दरांबाबत पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनही पेट्रोलपंप चालकांची संघटना आतापर्यंत माहिती देत होती. मात्र आता या संघटनेचे पदाधिकारी देखील माहिती देण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर दबाव आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय. मात्र बोलायचं थांबल्याने दर वाढायचे थांबणार नाहीत हे सगळेच जाणून आहेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या या दरांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याचं गणित कोलमडून पडणार आहे, हे नक्की.