(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lalit patil Drug Case : ललित पाटीलला मोबाईल दिला अन् आयुष्यभरासाठी फसला; येरवडा कारागृहातील एका पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या
ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.या पोलीस कर्मचाऱ्याने ललितला मोबाईल वापरण्यास दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
पुणे : ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील (Lalit Patil Drug Case) एका पोलीस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ललित पाटीलला पळून जाण्याच्या कालावाधील या पोलीस कर्मचाऱ्याने ललितला मोबाईल वापरण्यास दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मोईस शेख असं अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांकडून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. त्यात याची चौकशी केली असता मोईसने ललितला मोबाईल पुरवल्याचं निष्पन्न झालं आहे.
भूषण पाटीलसोबत फोनवर बोलायचा!
ललित पाटील हा कारागृहात बसून ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्या दरम्यान त्याला फोनची गरज भासत होती. याकाळात ललित पाटीलला विविध लोकांच्या संपर्कात राहावं लागत होतं. याच काळात मोईस शेखने ललित पाटीलला स्वतःचा फोन देऊन बाहेर ललितचा भाऊ भूषण पाटीलशी बोलण करून दिलं होतं. ललित पाटीलचा भाऊ नाशिकमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना चालवत होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा फोन वापरुन ललित पाटील भावाशी बोलत होता आणि दोघे मिळून हे रॅकेट चालवत होते.
महेंद्र शेवतेलाही अटक
ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यावर शेवतेला अटक करण्यात आली आहे. शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, 16 नंबर वॉर्ड मधील कैदी आणि ससुनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता. 16 नंबर वॉर्डमधे तो सतत ये जा करत होता. 16 नंबर वॉर्डमधे काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे शेवतेच्या चौकशीतून तो कोणाच्या सांगण्यावरून ललित पाटील आणि इतर कैद्यांना मदत करत होता हे समोर येणार आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणातील ही महत्वाची घडामोड समजली जात आहे.
पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक
ललित पाटील प्रकरणात आमदार रविंद्र धंगेकर यांनी पहिल्यापासून ससून रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची देखील त्यांनी सतत मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतेही कारवाई होत नसल्याने पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. यासाठी त्यांनी आता थेट पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाची बातमी-